All-party tributes to Dada : मुंबईहून बारामतीकडे जात असलेल्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंगच्या प्रयत्नात भीषण अपघात झाला आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात त्यांच्याबरोबर विमानातील सर्व प्रवासी तसेच कर्मचारी देखील मृत्युमुखी पडले आहेत. ही घटना आज, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी घडली, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.

बुलढाणा: मुंबईहून बारामतीकडे जात असलेल्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंगच्या प्रयत्नात भीषण अपघात झाला आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात त्यांच्याबरोबर विमानातील सर्व प्रवासी तसेच कर्मचारी देखील मृत्युमुखी पडले आहेत. ही घटना आज, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी घडली, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
अपघातानंतर महाराष्ट्रभरात राजकीय व सार्वजनिक स्तरावर तीव्र प्रतिसाद उमटत आहे. बुलढाणा जिल्ह्यात सर्वपक्षीय नेत्यांनी आणि संघटनांनी मिळून आज “बुलढाणा जिल्हा बंद” चे आवाहन केले आहे. नेत्यांनी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून शोकाकुल जनतेला शांतता व संयम पाळण्याचे आवाहन केले आहे.
बुलढाणा येथील सर्व प्रमुख पक्षांचे नेते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष टी. डी. अंभोरे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ताभाऊ काकस, भाजप नेते दत्ताभाऊ पाटील, तसेच चंद्रकांत बर्दे, महादेव शेळके, अनिल बावस्कर, बब्लू कुरेशी, सुजित देशमुख, सुनील सोनुने यांची बैठक पार पडली आणि सर्वपक्षीय निर्णयात हा बंद जाहीर केला आहे. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे तसेच शिवसेना नेत्यांशीही चर्चा झाल्याचे अंभोरे यांनी सांगितले.
जिल्ह्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा आशाताई अनंतराव पवार यांचे आज, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. राज्याच्या राजकारणातील प्रभावी व निर्णायक नेतृत्व हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने २८ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसीय राज्यस्तरीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, शासकीय इमारती व आस्थापनांवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकावण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी करत दुखवटा कालावधीत कोणतेही शासकीय किंवा सार्वजनिक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच शासनाच्या सूचनेनुसार दि. २८ जानेवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये व आस्थापना बंद राहतील, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असून, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातही शोकसभा, मौन पाळणे आणि श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन होत असून, दुखवटा शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

