Mahabreaking

[breaking_news]

Azim Nawaz Rahi :अजीम नवाज राही यांच्या ‘वळीवाच्या वेळा’ला लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार जाहीर

Azim Nawaz Rahi :  महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या इस्लामपूर शाखेच्या वतीने देण्यात येणाऱ्या यंदाच्या ‘लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय २०२५’ पुरस्कारांची घोषणा राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनी चे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, शाखेचे अध्यक्ष दिपक स्वामी आणि प्रा. धर्मवीर पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

Azim Nawaz Rahi

साखरखेर्डा : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या इस्लामपूर शाखेच्या वतीने देण्यात येणाऱ्या यंदाच्या ‘लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय २०२५’ पुरस्कारांची घोषणा राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनी चे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, शाखेचे अध्यक्ष दिपक स्वामी आणि प्रा. धर्मवीर पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

थकीत देयके वसुलीसाठी महावितरण आक्रमक; १८ मीटर जप्त

प्रख्यात मराठी कवी व नामवंत निवेदक अजीम नवाज राही यांच्या वळीवाच्या वेळा या बहुचर्चित कवितासंग्रहास हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा संग्रह अथर्व पब्लिकेशन, जळगाव यांनी प्रसिद्ध केला आहे.

लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रेरणादायी स्मृती जपण्यासाठी गत ३० वर्षांपासून ८ मार्च रोजी भव्य साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. ईश्वरपूर येथे संपन्न होणाऱ्या या साहित्य संमेलनात प्रसिद्ध लेखिका व कवयित्री प्रज्ञा पवार यांच्या हस्ते वरील पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

अजीम नवाज राही हे महाराष्ट्राच्या लेखणी आणि वाणी या दोन्ही क्षेत्रांतील महत्त्वाचे व वलयांकित नाव मानले जाते. व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातला एकांत, वर्तमानाचा वतनदार, तळमळीचा तळ आणि नुकताच प्रसिद्ध झालेला वळीवाच्या वेळा असे त्यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.

अजीम नवाज राही हे नाव नवनिर्मिती आणि प्रयोगशीलतेचे प्रतीक मानले जाते. कुठल्याही रूढ मार्गाने न जाता त्यांनी वर्तमान मराठी कवितेत स्वतःची स्वतंत्र नाममुद्रा ठसठशीतपणे उमटवली आहे. त्यांच्या कवितेने परिघावरील विश्व मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी आणले आहे. त्यांच्या कवितेत व्यक्त होणारे दुःख हे सर्वसामान्य, शेतकरी, शेतमजूर, कामगार, शोषित आणि अस्तित्वासाठी झगडणाऱ्या माणसांच्या जगण्यातील आहे.

प्रतिष्ठासंपन्न अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कवितासंग्रहांचा गौरव झाला आहे. धर्म, जात, पंथ यांच्या तटबंदीपलीकडे जाऊन माणुसकीची निखळ काळजी व्यक्त करणारी त्यांची कविता वास्तव, सकसता आणि प्रयोगशीलतेचा ध्यास घेणारी आहे. भाषिक व अनुभवाच्या अंगाने समृद्ध असलेली ही कविता समग्र चिंतित वर्तमान कवेत घेणारी ठरते.

त्यांच्या कवितेतील वस्तुनिष्ठता, सच्चाई, प्रतिमाशृंखलांचे अनोखे लावण्य आणि मातीचा सुवास लाभलेली भरजरी, चवदार भाषा ही त्यांची मोठी ताकद आहे. स्वतःची खास मृदगंधी शब्दकळा जोपासत लेखन करणारे अजीम नवाज राही हे वर्तमान पिढीतील महत्त्वाचे कवी म्हणून ओळखले जातात. कवितागणिक आणि संग्रहागणिक त्यांच्या लेखनाचे निराळेपण अधोरेखित झाले आहे. मुस्लिम संस्कृतीसह सर्वधर्मीय जीवनरितींचे बहुपदरी चित्र उभे करणारी त्यांची कविता मूलत: मानव्याचे स्तवन करणारी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top