Mehkar municipality : सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत पेनटाकळी प्रकल्पावरून मेहकर शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या स्वहिस्सा रकमेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नगरपालिकेची आर्थिक क्षमता नसल्याने अडचणीत सापडलेल्या या योजनेसाठी माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून १० कोटी ९१ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत दि. १६ जानेवारी २०२६ रोजी नगरविकास विभागाने विशेष परिपत्रक काढून नगरपालिकेला ही रक्कम अदा करण्याचा शासकीय आदेश दिला आहे.

माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नांना यश
मेहकर : सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत पेनटाकळी प्रकल्पावरून मेहकर शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या स्वहिस्सा रकमेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नगरपालिकेची आर्थिक क्षमता नसल्याने अडचणीत सापडलेल्या या योजनेसाठी माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून १० कोटी ९१ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत दि. १६ जानेवारी २०२६ रोजी नगरविकास विभागाने विशेष परिपत्रक काढून नगरपालिकेला ही रक्कम अदा करण्याचा शासकीय आदेश दिला आहे.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन आमदार संजय रायमुलकर यांनी सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत पेनटाकळी प्रकल्पावरून मेहकर शहरासाठी ७२ कोटी ७४ लाख रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना दि. २० डिसेंबर २०२२ रोजी मंजूर करून घेतली होती. या योजनेत ६१ कोटी २३ लाख रुपये शासकीय अनुदान तर १० कोटी ९१ लाख रुपये नगरपालिकेने स्वहिस्सा म्हणून भरणे आवश्यक होते. मात्र नगरपालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने हा स्वहिस्सा भरणे शक्य होत नव्हते.
ही अडचण लक्षात घेऊन संजय रायमुलकर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दि. ८ ऑक्टोबर २०२५ व १७ ऑक्टोबर २०२५ रोजी पत्रव्यवहार करून नगरपालिकेला कर्ज व अनुदान स्वरूपात १० कोटी ९१ लाख रुपये उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून नगरपालिकेला हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सध्या मेहकर शहराला कोराडी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जात आहे. २०३५ सालची लोकसंख्या लक्षात घेऊन पेनटाकळी प्रकल्पावरून मंजूर झालेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. पेनटाकळी बुडीत क्षेत्रातील उद्भव कामे, जलशुद्धीकरण प्रकल्प, वाढीव क्षेत्रासह शहरात ८७ किलोमीटर अंतर्गत जलवाहिन्या टाकणे, तसेच तीन मोठ्या पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
नगरपालिकेवर आर्थिक ताण येऊ नये व नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, यासाठी संजय रायमुलकर यांनी स्वहिस्स्याचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. हा निधी मिळाला नसता तर वाढीव पाणीपुरवठा योजना रखडली असती व शहराच्या विकासाला मोठा फटका बसला असता. त्यांच्या तातडीच्या हालचालीमुळे नगरविकास विभागाकडून निधी प्राप्त झाला आहे.
नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर मेहकर शहरातील नागरिकांना दिवसरात्र पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याने शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

