The fraudulent Baba : तालुक्यातील निंभा गावातील चेतन सुनील मुळे (वय २४) याने स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा करत दरबार भरवून लहान मुलांवर अमानुष कृत्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला शुक्रवारी अटक केली आहे.या आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

बालकांवरील अमानुष कृत्य प्रकरण : अमरावती येथून पोलिसांनी केली होती अटक
संजय उमक
मूर्तिजापूर : तालुक्यातील निंभा गावातील चेतन सुनील मुळे (वय २४) याने स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा करत दरबार भरवून लहान मुलांवर अमानुष कृत्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला शुक्रवारी अटक केली आहे.या आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
कोट्यवधींची फॉरेन्सिक व्हॅन ‘धक्का स्टार्ट’वर; पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
काही दिवसांपूर्वी एका भोंदू बाबाचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती लहान मुलांना त्यांच्या कपड्यांना तोंडाने पकडून फिरवत असल्याचे दिसून येत होते. या गंभीर प्रकाराची दखल घेत बाल कल्याण समिती, अकोला येथील सदस्य प्रांजली मनोज जैस्वाल यांच्या फिर्यादीवरून पोलिस स्टेशन मूर्तिजापूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरुद्ध भा.न.सं. कलम १२५ तसेच बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अंतर्गत कलम ७५ (बालकांवरील क्रूरता) आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१३ अंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक मदतीच्या सहाय्याने आरोपी अमरावती येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १ दिवसांची पोलिस कोठडी (पीसीआर) सुनावली आहे. पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक अकोला, अपर पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी मूर्तिजापूर तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात ठाणेदार, पोलिस उपनिरीक्षक व कर्मचारी यांचा सहभाग होता.

