Subsidies Pending :ठिबक व तुषार सिंचनासाठी शासनाकडून मंजूर झालेले अनुदान तब्बल तीन वर्षांपासून रखडल्यामुळे देऊळगाव राजा तालुक्यातील ८१ शेतकरी आता आक्रमक झाले असून, त्यांनी थेट उपोषणाचा इशारा दिला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे.

ठिबक-तुषार अनुदानासाठी शेतकरी आक्रमक; देऊळगाव राजात आंदोलन पेटणार
गजानन तिडके
देऊळगाव राजा : ठिबक व तुषार सिंचनासाठी शासनाकडून मंजूर झालेले अनुदान तब्बल तीन वर्षांपासून रखडल्यामुळे देऊळगाव राजा तालुक्यातील ८१ शेतकरी आता आक्रमक झाले असून, त्यांनी थेट उपोषणाचा इशारा दिला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे.याविषयी सरपंच संघटना तालुका अध्यक्ष देऊळगाव राजा दीपक पाटील बुरकुल, सरपंच रोहना रावसाहेब डोके,आदर्श शेतकरी दादाराव चेके आदींसह इतर शेतकऱ्यांनी आंदोलनचा इशारा दिला आहे.
NAFCC योजनेअंतर्गत सन २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी पूर्वसंमती देण्यात आली होती. शासनाच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने संच उभारून कार्यान्वित केले. तपासणीची प्रक्रिया पूर्ण होऊन जवळपास तीन वर्षांचा कालावधी लोटला, तरीही एकाही शेतकऱ्याला अनुदानाचा एक रुपयाही मिळालेला नाही.
या संदर्भात शेतकऱ्यांनी तालुका व जिल्हा स्तरावर वारंवार पाठपुरावा केला. मात्र, प्रत्येक वेळी “अनुदान मिळाल्यावर वितरित करण्यात येईल” असे आश्वासन देऊन वेळ मारून नेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. परिणामी, आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
“शासनाच्या योजनेवर विश्वास ठेवून आम्ही गुंतवणूक केली; पण आजही अनुदानासाठी भटकंती करावी लागत आहे. आता शांत बसणार नाही,” असा संतप्त सूर शेतकऱ्यांकडून उमटत आहे.
दरम्यान, या अन्यायाविरोधात संबंधित ८१ शेतकरी लवकरच तालुका कृषि अधिकारी कार्यालय, देऊळगाव राजा येथे साखळी उपोषणास बसणार असून, यासाठी पोलीस प्रशासन व तहसील कार्यालयाकडे परवानगी मागण्यात आली आहे.
मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला असून, या परिस्थितीस पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

