agriculture has been affected :तालुक्यात मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यातील दोन मंडळांत अतिवृष्टी झाली असली तरी शासनाने साधी पाहणीसुद्धा केलेली नाही. त्यामुळे शेतकरी पार खचून गेले आहेत. “मेहनत बुडाली, शेती करपली, शेतात पिकांचे फुटले कोंब… शेतकऱ्यांचा वाली कोण?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सततधार पावसामुळे पिके सडली, लोकप्रतिनिधी मात्र ‘रेंज’बाहेर
तेल्हारा : तालुक्यात मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यातील दोन मंडळांत अतिवृष्टी झाली असली तरी शासनाने साधी पाहणीसुद्धा केलेली नाही. त्यामुळे शेतकरी पार खचून गेले आहेत. “मेहनत बुडाली, शेती करपली, शेतात पिकांचे फुटले कोंब… शेतकऱ्यांचा वाली कोण?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तालुक्यातील हिवरखेड व अडगाव मंडळात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. हिवरखेड मंडळात ८२ मि.मी. तर अडगाव मंडळात ६५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मात्र, या भागात कोणत्याही अधिकाऱ्यांनी साधी पाहणीसुद्धा केली नाही.गेल्या तीन दिवसांत झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळै शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन पिकाला बुरशी लागली, काही भागात कोंब फुटले आहेत, तर कपाशी पिकाच्या बोंड्या काळ्या पडल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. शेती पिकांवर केलेला खर्च परत मिळवणे कठीण झाले असून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. घेतलेले कर्ज, मुला-मुलींचे शिक्षण, दैनंदिन खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
तालुक्यातील सर्व मंडळांत अतिवृष्टी झाली असली तरी शासनाने तसेच मतदारांच्या मतांवर निवडून आलेल्या कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. शासनाने शेतातील पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
याबाबत तहसीलदार समाधान सोनवणे यांनी सांगितले की, “ज्या मंडळांत अतिवृष्टी झाली आहे त्या मंडळांतील शेती पिकांची पाहणी करून त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती पाठवण्यात येईल. त्याचा अहवाल सुद्धा सादर केला जाईल.”
दरम्यान, युवा शेतकरी प्रणव खारोडे म्हणाले की, “तेल्हारा तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बॅंकांकडून कर्ज घेऊन पेरणी केली होती, पण पावसामुळे पिकांची परिस्थिती दयनीय झाली आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांची मदत करावी.”

