Gujarat youth brutally murdered : राष्ट्रीय महामार्गावरील तिवसा तालुक्यातील भारवाडी पुलाजवळील आयआरबी कंपनीच्या ट्रक ले-बाय परिसरात २० फेब्रुवारीच्या पहाटे गुजरातमधील राजकोट येथील एका ३० वर्षीय युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना तिवसा पोलिस ठाणे हद्दीत घडली असून आरोपी फरार आहे.

तिवसा : राष्ट्रीय महामार्गावरील तिवसा तालुक्यातील भारवाडी पुलाजवळील आयआरबी कंपनीच्या ट्रक ले-बाय परिसरात २० फेब्रुवारीच्या पहाटे गुजरातमधील राजकोट येथील एका ३० वर्षीय युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना तिवसा पोलिस ठाणे हद्दीत घडली असून आरोपी फरार आहे.
मृतकाची ओळख विमल सतीश अग्रावत (वय ३०, रा. गांधीग्राम, राजकोट, गुजरात) अशी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृतक आणि त्याचा एक साथीदार नागपूरहून दुचाकीने प्रवास करत होते. पहाटे सुमारे चारच्या सुमारास ते भारवाडी-वर्धा पुलाजवळील ले-बाय परिसरात थांबले होते. त्याचदरम्यान दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनास्थळी महत्त्वाचे पुरावे
घटनास्थळावरून पोलिसांनी एमएच ४७ बी ९१३१ क्रमांकाची दुचाकी, बॅग, चप्पल आणि रक्ताने माखलेला चाकू जप्त केला. बॅगमध्ये मोबाईल, दुचाकीची नंबर प्लेट, कपडे आणि आधारकार्ड आढळून आले. मोबाईलच्या आधारे नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली.
फरार साथीदाराचा शोध सुरू
घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले; मात्र पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत पंचनामा केला.
“मृतकाची ओळख पटली असून नातेवाईकांना कळविण्यात आले आहे. चौकीदाराच्या माहितीनुसार मृतक व त्याचा साथीदार रात्री येथे झोपण्यासाठी थांबले होते. सकाळी विमल मृतावस्थेत आढळला, तर त्याचा साथीदार फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे,” अशी माहिती पोलिस निरीक्षक गोपाल उपाध्याय यांनी दिली.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
हत्या वैयक्तिक वादातून झाली की इतर कोणत्या कारणामुळे, याचा सखोल तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही चौफेर तपास करत आहे.
या घटनेमुळे महामार्ग परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांकडून सुरक्षेची मागणी होत आहे. पोलिसांनी लवकरच आरोपीचा माग काढून घटनेचा उलगडा करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
अमरावती पालिकेच्या सभेत डीपीआर, कचरा व मोकाट श्वानांवरून खडाजंगी

