A major fire caused : दिवसभर काम करून घरी परतल्यानंतर जेवण करून विश्रांती घेत असतानाच अचानक घराला आग लागल्याची घटना रविवार, दि. ३१ जानेवारी रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत घरातील जीवनावश्यक साहित्य व रोख रक्कम जळून खाक झाली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

राहुल सोनोने
वाडेगाव : दिवसभर काम करून घरी परतल्यानंतर जेवण करून विश्रांती घेत असतानाच अचानक घराला आग लागल्याची घटना रविवार, दि. ३१ जानेवारी रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत घरातील जीवनावश्यक साहित्य व रोख रक्कम जळून खाक झाली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वाडेगाव येथील पंचशील नगर परिसरात राहणारे मजूर शेख जफार शेख इब्राहिम यांच्या घरात ही आग लागली. घरात विद्युतपुरवठा नसल्याने प्रकाशासाठी मेणबत्ती लावण्यात आली होती. थकलेल्या अवस्थेत कुटुंबीय पांघरुणावर विश्रांती घेत असतानाच अचानक घराला आग लागली आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले.
आगीचा तडाखा इतका भीषण होता की घराच्या छताच्या लाकडी बल्ली जळून कोळसा झाल्या. ही घटना लक्षात येताच नितेश आठे, जितेंद्र डोंगरे, मस्तान बेग, अहमद बेग, अक्षय डोंगरे आदी युवकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
या आगीत शेख जफार शेख इब्राहिम हे भाजल्याने जखमी झाले. त्यांना तातडीने वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सोहेल खान यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे रेफर केले. या घटनेमुळे पंचशील नगर परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित कुटुंबावर अचानक ओढवलेल्या संकटामुळे नागरिकांकडून सहानुभूती व्यक्त करण्यात येत आहे.

