Accused arrested: तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या दुधलम येथील घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने व रोकड चोरून नेणाऱ्या आरोपीस मुद्देमालासह २९ सप्टेंबर रोजी पाेलिसांनी अटक केली.

बार्शीटाकळी: तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या दुधलम येथील घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने व रोकड चोरून नेणाऱ्या आरोपीस मुद्देमालासह २९ सप्टेंबर रोजी पाेलिसांनी अटक केली.
फिर्यादी अनुराधा अनिल महल्ले रा. दुधलम या १६ ऑगस्ट रोजी त्यांच्या जेठानीच्या घरी झोपण्यासाठी गेल्या असता चोरट्याने घरात कुणी नसल्याचा फायदा घेत घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने व नगदी रोकडवर हात साफ केला. पहाटे उठून फिर्यादी आपल्या घरी गेल्या असता त्यांना हा प्रकार लक्षात आला.त्यांनी पिंजर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक ,अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी ,उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे ,गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचे तपास पथक तयार करण्यात आले. चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सुनील श्रीकृष्ण काकड रा. दाताळा ता. मुर्तीजापुर यास पोलिसांनी ताब्यात घेऊन २९ सप्टेंबर रोजी अटक केली व त्याचे कडून सोन्याची पोत, सोन्याचा गोप, चांदीचा करंडा व देव, चोरीच्या गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल, पोलीस स्टेशन माहुली जि.अमरावती ग्रामीण येथील चोरीची मोटारसायकल क्रमांक एम.पी. ४८ झेड. सी. ६७९१आदी मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे, एएसआय चव्हाण, नागसेन वानखडे, चंद्रशेखर गोरे, वैभव मोरे, नजीर हुसेन ,अयाज खान, शरद पवार आदींनी केली.

