Youth murdered: उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खांबोरा येथे प्रेमसंबंधाच्या कारणावरून तरुणाची लोखंडी रॉड व टोकदार वस्तूने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी उरळ पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून अवघ्या तीन तासांत मुख्य तीन आरोपींना ताब्यात घेतले. वासुदेव रामभाऊ भरणे (वय ६०), चेतन वासुदेव भरणे (वय ३२) आणि सचिन सारंगधर भरणे (वय ३७), सर्व रा. खांबोरा, अशी आरोपींची नावे आहेत.शैलेश श्रीकृष्ण तेलगोटे (वय २७) रा.खांबोरा असे मृतक युवकाचे नाव आहे.

खांबोरातील खुनाने खळबळ; दिशाभूल करणारा बनाव उघड, तिघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात
अकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खांबोरा येथे प्रेमसंबंधाच्या कारणावरून तरुणाची लोखंडी रॉड व टोकदार वस्तूने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी उरळ पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून अवघ्या तीन तासांत मुख्य तीन आरोपींना ताब्यात घेतले. वासुदेव रामभाऊ भरणे (वय ६०), चेतन वासुदेव भरणे (वय ३२) आणि सचिन सारंगधर भरणे (वय ३७), सर्व रा. खांबोरा, अशी आरोपींची नावे आहेत.शैलेश श्रीकृष्ण तेलगोटे (वय २७) रा.खांबोरा असे मृतक युवकाचे नाव आहे.
पाळोदी येथील निलेश श्रीकृष्ण तेलगोटे यांनी २२ ऑगस्ट रोजी उरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांचा भाऊ शैलेश श्रीकृष्ण तेलगोटे (वय २७) याचे खांबोरा येथील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या कारणावरून तरुणीचे नातेवाईक वासुदेव भरणे व इतरांनी संगनमत करून शैलेश याला डोक्यात, हातावर आणि शरीरावर लोखंडी रॉड व टोकदार वस्तूने गंभीर मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या तक्रारीवरून उरळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३५१(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
दिशाभूल करण्याचा प्रयत्न; पोलिसांनी उलगडले खरे प्रकरण
गुन्ह्याची तक्रार दाखल होण्यापूर्वी आरोपींनी खांबोरा गावात चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका इसमाला लोकांनी मारहाण करून पकडून ठेवल्याचा बनाव केल्याचे पोलिसांनी सांगितले. या माध्यमातून गावकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनास्थळी ठोस पुरावेही आढळून येत नसताना पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारे बारकाईने तपास सुरू केला.
घटनास्थळाची पाहणी, परिस्थितीजन्य पुरावे, जनसंपर्क, गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती, मृताच्या अंगावरील जखमांचे निरीक्षण आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. त्यानंतर वासुदेव भरणे, चेतन भरणे आणि सचिन भरणे यांनी प्रेमसंबंधाच्या कारणावरून शैलेश याच्यावर हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हा घडल्यानंतर तिन्ही आरोपी गावातून फरार झाले होते. पोलिसांनी परिसरात तातडीने शोधमोहीम राबवून त्यांना ताब्यात घेतले. आरोपींना अटक करण्याची पुढील कार्यवाही सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे, पोलीस हवालदार विजय चव्हाण, रघुनाथ नेमाडे, श्रीकृष्ण सोळंके, अनंत सुरवाडे, पोलीस अंमलदार विकास राठोड तसेच चालक नागरे आणि वाकोडे यांच्या पथकाने केली.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

