Two-wheeler rams : अंढेरा ते मलकापूर पांग्रा मार्गावर शनिवारी (दि. २२ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रस्त्यावर विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या आयशरला दुचाकीने मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एका युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

रस्त्यावर उभ्या वाहनाचा फटका; मलकापूर पांग्रा-अंढेरा मार्गावर दोन युवक जखमी
फकीरा पठाण
मलकापूर पांग्रा : अंढेरा ते मलकापूर पांग्रा मार्गावर शनिवारी (दि. २२ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रस्त्यावर विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या आयशरला दुचाकीने मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एका युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उर्दू उच्च प्राथमिक शाळेजवळ आयशर क्रमांक एमएच २८ बीबी ५६०४ रस्त्यावर विरुद्ध दिशेने उभा होता. दरम्यान, डोरव्ही येथे कामानिमित्त गेलेले आकाश तेजराव साळवे (वय २८) आणि ताजीम नाझीम पठाण (वय १९) हे युनिकॉन दुचाकी क्रमांक एमएच २८ सीए २२४९ वरून मलकापूर पांग्र्याकडे परतत होते. त्यावेळी शाळेजवळ उभ्या असलेल्या आयशरला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली.
या अपघातात दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने जखमींना मलकापूर पांग्रा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोघांनाही पुढील उपचारासाठी जालना येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी एका युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्त लिहेपर्यंत या घटनेप्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नव्हती.
रस्त्यावर वाहने उभी करण्याच्या प्रकारावर ग्रामस्थ संतप्त
मलकापूर पांग्रा-अंढेरा मार्गाचे गेल्या वर्षी रुंदीकरण करण्यात आले आहे. मात्र, या मार्गावर नागरिकांकडून सर्रासपणे वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची एकच बाजू वाहतुकीसाठी उपलब्ध राहत असल्याने छोटे-मोठे अपघात घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
आयशरसारखे मोठे वाहन रस्त्यावर उभे नसते, तर कदाचित हा अपघात टाळता आला असता, अशी चर्चा घटनेनंतर गावात सुरू होती. त्यामुळे रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांवर संबंधित विभागाने कारवाई करावी. तसेच ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष घालून रस्त्यावरील अडथळे दूर करावेत आणि संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

