First-time MLA : तब्बल १६ वर्षांनंतर होत असलेल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दिग्गज नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित प्रतिनिधित्व न मिळाल्याने सिंदखेडराजाचे आमदार मनोज कायंदे यांनी थेट निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बिनविरोध होण्याच्या मार्गावर असलेली निवडणूक आता प्रस्थापित विरुद्ध परिवर्तन अशा संघर्षाच्या दिशेने गेली आहे.

प्रस्थापितांना धक्का देत मनोज कायंदेंचा सहकारात एल्गार; ‘अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ रिंगणात
गजानन तिडके
देऊळगाव राजा : तब्बल १६ वर्षांनंतर होत असलेल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दिग्गज नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित प्रतिनिधित्व न मिळाल्याने सिंदखेडराजाचे आमदार मनोज कायंदे यांनी थेट निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बिनविरोध होण्याच्या मार्गावर असलेली निवडणूक आता प्रस्थापित विरुद्ध परिवर्तन अशा संघर्षाच्या दिशेने गेली आहे.

खामगाव येथे सर्वपक्षीय बैठक घेऊन जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेण्याची भूमिका या बैठकीत मांडण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह काही प्रमुख नेत्यांची बिनविरोध निवड झाली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी सोसायटी मतदारसंघातील आणखी दहा उमेदवार बिनविरोध झाल्याने एकूण १२ संचालक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.
मात्र, आमदार मनोज कायंदे यांनी सुचविलेल्या काही नावांना अपेक्षित प्रतिनिधित्व मिळाले नसल्याने बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांना तडा गेला. ‘सहकारात पक्षीय राजकारण नसते, तर सर्वांना समान न्याय का नाही?’ असा सवाल करीत कायंदे यांनी प्रस्थापित नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला.
जिल्हा बँक ही शेतकरी आणि सर्वसामान्यांची हक्काची संस्था असल्याचे सांगत, तिच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमचीही भूमिका होती. मात्र, सर्वांना न्याय मिळत नसेल तर केवळ बिनविरोध निवडणुकीचा आग्रह कशासाठी, असा सवाल कायंदे यांनी उपस्थित केला. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून जिल्हा बँकेचे नेतृत्व काही ठरावीक मंडळी आलटून-पालटून करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या कालावधीतील कारभार आणि बँकेसमोरील आव्हानांवर आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी सक्षम, पारदर्शक आणि जबाबदार नेतृत्वाची गरज व्यक्त केली.
नऊ जागांवर परिवर्तन पॅनल मैदानात
जिल्हा सहकारी बँकेला उभारी देण्यासाठी स्व. अजितदादा पवार यांनी प्रयत्न केले होते. मात्र, त्याच विचारांच्या पक्षाला निवडणूक प्रक्रियेतून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आमदार कायंदे यांनी केला. त्यामुळे उर्वरित नऊ जागांवर ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ च्या माध्यमातून उमेदवार उभे करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे.
मलकापूर, लोणार आणि संग्रामपूर या सोसायटी मतदारसंघांसह महिला, अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय मतदारसंघातील जागांचा यात समावेश आहे. या नऊ जागांसाठी एकूण २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सहकारातील प्रस्थापित समीकरणांना धक्का
राजकारणात तुलनेने नवखे असलेल्या आमदार मनोज कायंदे यांनी सहकार क्षेत्रातील अनेक वर्षांच्या प्रस्थापित समीकरणांना थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची ही निवडणूक केवळ संचालक निवडीपुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील आगामी सत्तासमीकरणाची दिशा ठरविणारी ठरण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा बँकेच्या कारभारात सक्रिय असलेल्या दिग्गजांसमोर कायंदे यांनी उभे केलेले आव्हान कितपत यशस्वी ठरते, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, कायंदे यांच्या आक्रमक भूमिकेला प्रस्थापित नेते कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतात, याचीही उत्सुकता आहे.
तब्बल १६ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत बँकेच्या कारभाराचा हिशेब मतदारांच्या दरबारात मांडला जाणार आहे. ‘परिवर्तन’चा नारा देत आमदार कायंदे यांनी उघडलेले आव्हान मतदार कितपत स्वीकारतात, यावर जिल्हा बँकेच्या आगामी सत्तासमीकरणाची दिशा निश्चित होणार आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी मतदारांना केले आवाहन
बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक ही सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासोबतच शेतकरी बांधवांना वेळेवर, सुलभ आणि पारदर्शक कर्जपुरवठा उपलब्ध करून देणारी महत्त्वाची संस्था आहे. या बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने ‘अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ पूर्ण ताकदीने आणि निष्ठेने मैदानात उतरले आहे. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर आणि विचारसरणीवर विश्वास ठेवून सहकार क्षेत्रात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडविणे, शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे, सहकारातील पारदर्शकता वाढविणे आणि जिल्हा बँकेचा सर्वांगीण विकास साधणे, या उद्देशाने हे पॅनल काम करणार आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक अडचणीत असताना जिल्ह्यातील काही प्रमुख नेते अजितदादा पवार यांच्याकडे आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करीत होते. त्या काळात अजितदादा पवार यांनी बँकेला आर्थिक मदत करून ती पुन्हा सक्षमपणे उभी राहावी आणि शेतकऱ्यांच्या या महत्त्वाच्या संस्थेला नवसंजीवनी मिळावी, यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. या मदतीमुळे बँकेला अडचणीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यास हातभार लागला.
मात्र, आज बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत अजितदादा पवार यांच्या पक्षाला अपेक्षित स्थान मिळाले नसल्याची खंत वाटते. त्यामुळे त्यांच्या नावाने ‘अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ उभे करण्यात आले आहे.
सहकारातील पारदर्शकता, शेतकऱ्यांची समृद्धी, जिल्हा बँकेचा सर्वांगीण विकास आणि अजितदादा पवार यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी मैदानात उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत या पॅनलच्या सुशिक्षित, अभ्यासू आणि निष्ठावंत उमेदवारांना ट्रॅक्टर या चिन्हावर मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन सुनेत्रा अजितदादा पवार यांनी केले आहे.
“परिवर्तनासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि जिल्हा बँकेच्या सक्षम भविष्यासाठी ‘अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ला विजयी करा,” असे आवाहन त्यांनी केले.

