Young farmer: बाळापूर तालुक्यातील वाडेगाव स्थानिक पोलिस चौकीच्या हद्दीत लक्ष्मण रामभाऊ इंगळे (वय ३६) या युवा शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार, २० सप्टेंबर रोजी रात्री सुमारे दहा वाजता घडली.

पावसाअभावी पिकांचे नुकसान, कर्जाचा वाढता भार; ३६ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
राहुल सोनोने
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव स्थानिक पोलिस चौकीच्या हद्दीत लक्ष्मण रामभाऊ इंगळे (वय ३६) या युवा शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार, २० सप्टेंबर रोजी रात्री सुमारे दहा वाजता घडली.
नापिकी आणि कर्जाच्या चिंतेतून टोकाचे पाऊल?
मिळालेल्या माहितीनुसार, सततची नापिकी, पावसाअभावी पिकांचे झालेले नुकसान आणि शेतीसाठी घेतलेले उसनवारीचे पैसे यामुळे लक्ष्मण इंगळे हे चिंतेत होते, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. याच विवंचनेतून त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच वाडेगाव पोलिस चौकीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रशांत डोईफोडे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
मृत लक्ष्मण इंगळे यांच्या पश्चात आई-वडील आणि दोन मुले असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाडेगाव पोलिस करीत आहेत.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

