Two burglaries : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे रविवार, २० सप्टेंबरच्या रात्री चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली आहे. शिक्षक कॉलनी आणि पाल्हाडे ले-आउट परिसरातील दोन घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले. यातील एका घटनेतील तीन संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद; शिक्षकांच्या घरांवर धाडसी चोरीने वाडेगाव हादरले
राहुल सोनोने
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे रविवार, २० सप्टेंबरच्या रात्री चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली आहे. शिक्षक कॉलनी आणि पाल्हाडे ले-आउट परिसरातील दोन घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले. यातील एका घटनेतील तीन संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश
मिळालेल्या माहितीनुसार, वाडेगाव येथील शिक्षक कॉलनीमधील शिक्षक अविनाश शिंदे यांच्या घराचा मागील दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील रोकड, मनगटी घड्याळ आणि चांदीची भांडी असा मुद्देमाल चोरीला गेल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पाल्हाडे ले-आउट परिसरातील सचिन भास्कर लोखंडे यांच्या घरातही चोरट्यांनी धाडसी चोरी केली. चोरट्यांनी बेडरूमचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यामध्ये तीन अनोळखी चोरटे दिसून येत असल्याची माहिती आहे.
कोयत्यांचा धाक दाखवत दागिने व रोकड लंपास
सचिन लोखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीच्या वेळी तीन चोरट्यांपैकी दोघे त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीसमोर उभे होते. ते हिंदी भाषेत बोलत होते आणि त्यांच्या हातात कोयते होते. तर तिसरा चोरटा कपाट उघडून पैसे व दागिने शोधत होता.
या घटनेत पत्नीचे अंदाजे ११ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ज्याची किंमत सुमारे १ लाख ११ हजार रुपये, तसेच साडेचार ग्रॅम सोन्याची अंगठी, अंदाजे १६ हजार रुपये आणि २५ हजार रुपये रोख, असा मुद्देमाल चोरीला गेल्याचे लोखंडे यांनी सांगितले.
दोन्ही घटनांमध्ये सुमारे १ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल चोरीला
अविनाश शिंदे यांच्या घरातून अंदाजे एक हजार रुपये रोख, मनगटी घड्याळ आणि तीन हजार रुपये किमतीची चांदीची भांडी चोरीला गेल्याची माहिती देण्यात आली आहे. दोन्ही घटनांमध्ये मिळून सुमारे १ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी सचिन लोखंडे आणि अविनाश शिंदे यांनी बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून संशयितांचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
पोलिसांच्या गस्तीसंदर्भात प्रश्नचिन्ह
सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने गावोगावी पोलिस प्रशासनाकडून गस्त आणि बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत वाडेगाव येथे एकाच रात्री दोन घरफोड्यांच्या घटना घडल्याने पोलिसांच्या गस्तीवर आणि सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
या चोरीच्या घटनांची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

