Prataprao Jadhav : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन शिवसेनेचे नेते तथा केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. प्रत्येक सर्कल व प्रभागात पक्षाची ताकद वाढवून ५ एप्रिल रोजी चिखली येथे होणारा भव्य पक्षप्रवेश सोहळा यशस्वी करण्यासाठी नियोजनबद्ध काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

५ एप्रिलच्या चिखलीतील पक्षप्रवेश सोहळ्याच्या नियोजन बैठकीत पदाधिकाऱ्यांना सूचना
बुलढाणा : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन शिवसेनेचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. प्रत्येक सर्कल व प्रभागात पक्षाची ताकद वाढवून ५ एप्रिल रोजी चिखली येथे होणारा भव्य पक्षप्रवेश सोहळा यशस्वी करण्यासाठी नियोजनबद्ध काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
चिखली येथील राधाबाई खेडेकर विद्यालयात २९ मार्च रोजी तालुकास्तरीय शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना जाधव बोलत होते.
बैठकीस उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के, तालुकाप्रमुख गजानन मोरे, शहरप्रमुख विलास घोलप, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद हाडे, नगरपरिषद उपाध्यक्षा वैशाली कपील खेडेकर, शिक्षक सेनेचे वसंतराव गाडेकर यांच्यासह तालुका व विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना जाधव म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. या सर्वांना सोबत घेत पक्षाची ताकद वाढविणे ही काळाची गरज आहे. ते पुढे म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्याने मित्रपक्ष दुखावेल, अशी भाषा किंवा टीका टाळावी. मतभेद आणि मनभेद निर्माण होणार नाहीत, याची सर्वांनी काळजी घ्यावी. पक्षवाढीसाठी एकजूट आणि समन्वय महत्त्वाचा असून प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःची ताकद वाढवून आपल्या प्रभागात संघटन अधिक सक्षम करावे. एक-दोन महिन्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेता, कार्यकर्त्यांनी आतापासूनच निवडणूकपूर्व तयारीला लागावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ५ एप्रिल रोजी चिखली येथे होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्याचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीला शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना आणि किसान सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

