Mahabreaking

[breaking_news]

Z.P. School :तंत्रज्ञानाच्या साथीने दिग्रस बु.ची जि.प. शाळा बनली गुणवत्तेचे केंद्र; खासगी शाळांना टक्कर

Z.P. School : खासगी शाळांकडे वाढता कल, बदलती शिक्षणपद्धती आणि स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळांसमोरील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, या परिस्थितीला अपवाद ठरत पातूर पंचायत समितीअंतर्गत दिग्रस बु. येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जिल्हा परिषद केंद्रीय शाळेने गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिक्षकांच्या कल्पकतेतून शाळेचा कायापालट झाल्याने आजूबाजूच्या गावांतील विद्यार्थीही या शाळेकडे आकर्षित होत आहेत.

School

 विद्यार्थीसंख्या वाढवून जिल्हा परिषद शाळेचा कायापालट; दिग्रस बु.च्या शिक्षकांची मेहनत फळाला

राहुल सोनोने

दिग्रस बु.  : खासगी शाळांकडे वाढता कल, बदलती शिक्षणपद्धती आणि स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळांसमोरील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, या परिस्थितीला अपवाद ठरत पातूर पंचायत समितीअंतर्गत दिग्रस बु. येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जिल्हा परिषद केंद्रीय शाळेने गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिक्षकांच्या कल्पकतेतून शाळेचा कायापालट झाल्याने आजूबाजूच्या गावांतील विद्यार्थीही या शाळेकडे आकर्षित होत आहेत.

सध्या खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची चढाओढ सुरू असताना अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थीसंख्या घटत असल्याचे चित्र आहे. काही शाळा विद्यार्थीसंख्येअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, दिग्रस बु. येथील जिल्हा परिषद शाळेने या प्रवाहाला छेद देत पालकांचा विश्वास संपादन केला आहे.

या शाळेत दिग्रस बु.सह तांदळी बु., तांदळी खुर्द, तुलंगा खुर्द, दिग्रस खुर्द आदी परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे काही पालक आपल्या पाल्यांना या शाळेत शिक्षण देण्यासाठी खासगी वाहनाने ये-जा करून घेतात. त्यामुळे शाळेने निर्माण केलेल्या शैक्षणिक वातावरणाची आणि गुणवत्तेची कल्पना येते.

आधुनिक सुविधा अन् गुणवत्तापूर्ण शिक्षण

शाळेच्या विकासात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. शाळेत संगणक प्रयोगशाळा, विज्ञान कक्ष, परसबाग तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. भव्य इमारतीसोबतच शाळेतील शैक्षणिक वातावरणही विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना केवळ नियमित अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता स्पर्धात्मक परीक्षांसाठीही मार्गदर्शन केले जाते. एनएमएमएस (NMMS) परीक्षेसाठी अतिरिक्त वर्ग, शिष्यवृत्ती परीक्षेच्या सरावासाठी विशेष वर्ग तसेच इंग्रजी विषयाचे विशेष अध्यापन शिक्षकांकडून घेतले जाते. दरवर्षी एनएमएमएस परीक्षेत विद्यार्थी पात्र ठरत असल्याने शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब होत आहे.

शिक्षकांच्या मेहनतीला पालकांची साथ

शाळेतील शिक्षकांकडून अतिरिक्त शिकवणी वर्गही घेतले जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण झाली आहे. शिक्षक स्वतःहून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वेळ देत असल्याने विद्यार्थ्यांची शिक्षकांशी असलेली जवळीक वाढली आहे. पालकही शाळेतील शैक्षणिक वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत समाधानी असल्याचे चित्र आहे.

मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे दिग्रस बु. येथील ही जिल्हा परिषद शाळा तालुक्यातच नव्हे, तर अकोला जिल्ह्यातही चर्चेचा विषय ठरली आहे. जिल्हा परिषद शाळांमध्येही आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि समर्पित शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देता येते, हे या शाळेने दाखवून दिले आहे.

‘टीमवर्क’मुळे शाळेचा कायापालट

शाळेच्या प्रगतीसाठी मुख्याध्यापक संजय बरडे, शिक्षक सुनील सदार, दिगंबर बराटे, सदानंद ढोरे, सौ. कविता धनोकार, कु. आरती नैताम, कु. स्नेहल अरखराव तसेच शाळामित्र सौ. प्रीती गवई मेहनत घेत आहेत.

या प्रयत्नांना शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांचेही भरभरून सहकार्य मिळत आहे. शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून उभे राहिलेले हे शैक्षणिक मॉडेल शिक्षक दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील इतर जिल्हा परिषद शाळांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top