Wild vegetables : पावसाळ्यात जंगल, शेतशिवार आणि परिसरातील नैसर्गिक भागात विविध प्रकारच्या रानभाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. पौष्टिक व आरोग्यवर्धक गुणांनी समृद्ध असलेल्या या रानभाज्यांचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, तसेच लोप पावत चाललेली पारंपरिक आहार संस्कृती जतन व्हावी, या उद्देशाने बुधवारी बाळापुरात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

बाळापुरात रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेतकरी, महिला बचत गटांचा सहभाग
बाळापूर: पावसाळ्यात जंगल, शेतशिवार आणि परिसरातील नैसर्गिक भागात विविध प्रकारच्या रानभाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. पौष्टिक व आरोग्यवर्धक गुणांनी समृद्ध असलेल्या या रानभाज्यांचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, तसेच लोप पावत चाललेली पारंपरिक आहार संस्कृती जतन व्हावी, या उद्देशाने बुधवारी बाळापुरात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या परिसरात आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन आत्मा तालुका सल्लागार समितीचे अध्यक्ष रविंद्र नेमाडे, जनसेवक बबलूभाऊ देशमुख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश्वरभाऊ वानखडे, नगरपरिषद उपाध्यक्ष सुरेंद्र धोपटे, नगरसेवक गुलाम खलील तसेच आत्मा समिती सदस्य अनंता राऊत, ऋषिकेश वाकडे, बाळूभाऊ हिरेकर व रेखा मानकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
महोत्सवात स्थानिक शेतकरी व महिला बचत गटांनी विविध रानभाज्यांचे स्टॉल उभारले होते. या माध्यमातून रानभाज्यांची ओळख, त्यांचे पौष्टिक मूल्य, पारंपरिक पद्धतीने तयार केले जाणारे विविध पदार्थ तसेच औषधी गुणधर्मांची माहिती नागरिकांना देण्यात आली. रानभाज्यांमधील पोषक घटक, पचनक्रियेस होणारे फायदे आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात त्यांची भूमिका याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
जनसेवक बबलूभाऊ देशमुख यांनी आधुनिक खाद्यसंस्कृतीच्या प्रभावामुळे हळूहळू लोप पावत असलेल्या रानभाजी संस्कृतीचे जतन करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश्वर वानखडे यांनी आरोग्य उत्तम राखण्यासाठी पारंपरिक व नैसर्गिक खाद्यपदार्थांना आहारात स्थान देणे आवश्यक असल्याचे सांगितले. रानभाज्या या निसर्गाची देणगी असून त्यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
आत्मा समिती सदस्य अनंता राऊत यांनी पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या विविध रानभाज्यांपासून पौष्टिक पदार्थ तयार करून त्यांचा आहारात समावेश करण्याचे आवाहन केले. कृषी अधिकारी मूलचंद राठोड यांनी रानभाज्यांचे महत्त्व व उपयोग याबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी सागर डोंगरे, उपतालुकाप्रमुख उमेश उबाळे, प्रगतिशील शेतकरी नीलकंठ साबळे, प्रकाश डीवरे, कृषिनिष्ठ पुरस्कारप्राप्त शेतकरी गणेश काळे, किरण हुसे, मंडळ कृषी अधिकारी राहुल शिरसाठ, अभिजीत लाड व व्ही.एम. शेगोकार यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी, कृषी सखी, नैसर्गिक शेतकरी गटांचे प्रतिनिधी,शेतकरी जुबेर अहमद, विजय सिंह ठाकुर, अब्दुल सलीम, मुशीर उल हक मेंबर, शाकिर अहमद, रिजवान मास्टर, अंसार अहमद इनामदार, वह सर्व शेतकरी मोठ्या संख्याने उपस्थित होते.
महोत्सवाच्या समारोपप्रसंगी स्टॉल लावणाऱ्या शेतकरी व महिला बचत गटांच्या प्रतिनिधींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही.एम. शेगोकार यांनी केले, तर आभार उपकृषी अधिकारी रामेश्वर मोरे यांनी मानले.

