Mahabreaking

[breaking_news]

teacher:“शिक्षक नाही तर आम्ही हलणार नाही!”:मोहना खुर्दच्या चिमुकल्यांचा बीडीओंच्या दालनात ठिय्या

teacher: “शाळेला शिक्षकच नसेल तर आम्ही शिकायचं तरी कसं?” असा संतप्त सवाल करत तालुक्यातील मोहना खुर्द (शेंदला) येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पालकांसह थेट गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात धडक देत ठिय्या आंदोलन छेडले. अनेक महिने दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षण विभागाला अखेर जाग येताच, शिक्षिकेची तातडीने नियुक्ती करण्यात आली.

teacher

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानाने  प्रशासन हादरले, अखेर शिक्षिकेची नियुक्ती

मेहकर : “शाळेला शिक्षकच नसेल तर आम्ही शिकायचं तरी कसं?” असा संतप्त सवाल करत तालुक्यातील मोहना खुर्द (शेंदला) येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पालकांसह थेट गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात धडक देत ठिय्या आंदोलन छेडले. अनेक महिने दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षण विभागाला अखेर जाग येताच, शिक्षिकेची तातडीने नियुक्ती करण्यात आली.
मोहना खुर्द येथील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा एक-शिक्षकी असून, गेल्या अनेक महिन्यांपासून येथे शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णपणे ठप्प झाले होते. १३ जानेवारी रोजी एका शिक्षकाची कागदोपत्री नियुक्ती करण्यात आली; मात्र तो शिक्षक आजपर्यंत रुजूच न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या अन्यायाला वैतागून विद्यार्थी व पालकांनी मेहकर येथील शिवसेना (शिंदे गट) कार्यालय गाठत आपली व्यथा माजी आमदार संजय रायमुलकर यांच्यासमोर मांडली. “जोपर्यंत शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही,” असा ठाम इशारा विद्यार्थ्यांनी दिला.
त्यानंतर माजी आमदार संजय रायमुलकर यांनी गटविकास अधिकारी श्री. खरात यांच्याशी थेट संपर्क साधत, “कुठल्याही परिस्थितीत आजच शिक्षक द्या,” अशी सक्त ताकीद दिली. यानंतर शालेय गणवेश व दप्तरासह विद्यार्थ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या दिला. “नियुक्त शिक्षक रुजू नाही, नवीन शिक्षक मिळेपर्यंत आम्ही येथून हलणार नाही,” असा निर्वाणीचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला.
परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच प्रशासनाला हालचाल करावी लागली. गटविकास अधिकारी श्री. खरात यांनी विद्यार्थ्यांसाठी चहा-बिस्किटांची व्यवस्था केली. गटशिक्षणाधिकारी श्री. वानखेडे यांनी तातडीने श्रीमती सावळे यांच्या नियुक्तीचे आदेश काढून त्यांना त्वरित शाळेवर रुजू होण्याच्या सूचना दिल्या.
शिक्षिकेची नियुक्ती झाल्याचे स्पष्ट होताच विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले. यावेळी पालक संतोष ताकतोडे, सतीश चौरे, संतोष वायाळ, माधव वाघ, काशीराम चौरे, रमेश भगवान चौरे, राजेंद्र सावंत, रमेश जंजाळ, शिवशंकर ताकतोडे, संतोष लाटे, बजरंग गोवर्धने यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top