Mahabreaking

[breaking_news]

Healthy Village :आरोग्यसंपन्न गाव पुरस्कारासाठी वाडेगावची जोरदार मुसंडी; लोकसहभागातून उभारणार आदर्श आरोग्य मॉडेल

Healthy Village : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानात राज्यस्तरीय पुरस्कार मिळविण्याच्या निर्धाराने वाडेगाव ग्रामपंचायतीने कंबर कसली आहे. गावातील प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग घेऊन वाडेगावला आरोग्यदृष्ट्या आदर्श गाव बनविण्याचा संकल्प ग्रामपंचायतीने केला आहे.

Healthy Village

  राज्यस्तरीय ‘आरोग्यसंपन्न गाव’ पुरस्काराचे लक्ष्य; वाडेगाव ग्रामपंचायतीची व्यापक जनजागृती मोहीम

राहुल सोनोने

वाडेगाव : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानात राज्यस्तरीय पुरस्कार मिळविण्याच्या निर्धाराने वाडेगाव ग्रामपंचायतीने कंबर कसली आहे. गावातील प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग घेऊन वाडेगावला आरोग्यदृष्ट्या आदर्श गाव बनविण्याचा संकल्प ग्रामपंचायतीने केला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने १८ फेब्रुवारी २०२६ रोजी शासन निर्णयाद्वारे सुरू केलेल्या या अभियानाची अंमलबजावणी एप्रिल २०२६ पासून राज्यभर सुरू आहे. या अभियानात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या ग्रामपंचायतीस ५ कोटी रुपये, द्वितीय क्रमांकास ३ कोटी रुपये, तर तृतीय क्रमांकास २ कोटी रुपये इतके भरीव पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय विभागीय व जिल्हास्तरावरही उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्याच्या पाहणीसाठी आलेले राज्य समन्वयक रवींद्र देशमुख यांनी शिरला आरोग्य उपकेंद्र, बाबुळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच बाळापूर येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांना अभियानातील विविध निकष व निर्देशकांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

त्यानंतर वाडेगाव ग्रामपंचायतीत आयोजित बैठकीत सरपंच मंगेश तायडे, उपसरपंच राजेश्वर पळसकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील मानकर, सुनील घाटोळ, सुनील राठोड, मोहम्मद मुजाहिद, सचिन धानोकर, शेख सलीम, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी बाळासाहेब घुगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा चिंचोळकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रवींद्र देशमुख यांनी आरोग्यसंपन्न गावासाठी आवश्यक असलेल्या सर्व निकषांची सविस्तर माहिती देत लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

बैठकीत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी वाडेगावला राज्यातील आदर्श आरोग्यसंपन्न गाव म्हणून विकसित करण्याचा निर्धार व्यक्त केला. सोशल मीडिया, पोस्टर, बॅनर, ग्रामसभा, महिला मंडळे, युवक मंडळे, बचत गट आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करून प्रत्येक कुटुंबाला या अभियानाशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच आरोग्य शिक्षण साहित्याची निर्मिती, जनजागृती उपक्रम आणि अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडाही निश्चित करण्यात आला. ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ यांच्यातील समन्वय, एकजूट आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठीची तळमळ लक्षात घेता वाडेगाव ग्रामपंचायत या अभियानात उल्लेखनीय यश संपादन करेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी बाळासाहेब घुगे यांनी अभियानाच्या प्रभावी प्रचार-प्रसिद्धीबाबत मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी वर्षा मीना आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्ह्यातील अधिकाधिक ग्रामपंचायती आरोग्यसंपन्न बनविण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top