Heavy rains : बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसात अतिवृष्टी झाली. 13 पैकी 11 तालुक्यात संततधार पाउस झाला. 91 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. मात्र,जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाने तळ गाठला आहे. प्रकल्पात जिवंत जलसाठा अद्यात शुन्य टक्के आहे. विदर्भात जोरदार पाऊस होत असला तरी खडकपूर्णा प्रकल्पात मराठवाड्यात झालेल्या पावसावर जलसाठा वाढतो. या प्रकल्पात येणारी केवळ धामणा नदीच प्रवाहीत झाली आहे.

४६ मिमी पावसाची नोंद; धरणात २ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक
गजानन तिडके
देऊळगाव राजा : बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसात अतिवृष्टी झाली. 13 पैकी 11 तालुक्यात संततधार पाउस झाला. 91 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. मात्र,जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाने तळ गाठला आहे. प्रकल्पात जिवंत जलसाठा अद्यात शुन्य टक्के आहे. विदर्भात जोरदार पाऊस होत असला तरी खडकपूर्णा प्रकल्पात मराठवाड्यात झालेल्या पावसावर जलसाठा वाढतो. या प्रकल्पात येणारी केवळ धामणा नदीच प्रवाहीत झाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा धरणात ऑगस्ट महिना सुरू झाला असला तरी शुन्य टक्के जलसाठा आहे.या प्रकल्पातून अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच सिंचनासाठीही या प्रकल्पावर शेतकरी अवलंबून आहेत.
तालुक्यातील महत्त्वाच्या खडकपूर्णा (मोठा) प्रकल्पात गेल्या २४ तासांत झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली असून धरणात २.०० दशलक्ष घनमीटर (MM³) पाण्याची आवक झाली आहे. मात्र, प्रकल्पातील जिवंत जलसाठा अद्याप शून्य टक्के असल्याने सिंचनाच्या दृष्टीने समाधानकारक स्थिती निर्माण होण्यासाठी आणखी चांगल्या पावसाची आवश्यकता असल्याचे चित्र आहे.
बुलढाणा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रसिद्ध केलेल्या ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजताच्या अहवालानुसार, खडकपूर्णा प्रकल्पाची पाणीपातळी ५१५.१० मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे. धरणातील एकूण पाणीसाठा ४८.३८ दशलक्ष घनमीटर असून, जिवंत जलसाठा शून्य असल्याची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या २४ तासांत परिसरात ४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, यंदाच्या हंगामातील एकूण पर्जन्यमान २३१ मिलीमीटर इतके झाले आहे. पावसामुळे धरणात २.०० दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली असून, आतापर्यंतची एकूण आवक ५.५५ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. सध्या धरणातून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नसून एकही दरवाजा उघडण्यात आलेला नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
खडकपूर्णा प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांनुसार, सांडवा पातळी ५१२.५० मीटर, तर पूर्ण संचय पाणीपातळी ५२०.५० मीटर आहे. धरणाची सांडवा पातळीपासून पूर्ण संचय पातळीपर्यंतची उंची ८ मीटर आहे. प्रकल्पाची एकूण संचय क्षमता १६०.६०६ दशलक्ष घनमीटर असून त्यापैकी ९३.४०४ दशलक्ष घनमीटर जिवंत जलसाठा आणि ६७.२०२ दशलक्ष घनमीटर मृत जलसाठा अशी रचना आहे.
सध्या धरणात पाण्याची आवक सुरू असली तरी जिवंत जलसाठा निर्माण होण्यासाठी आणखी सातत्यपूर्ण आणि मुसळधार पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आगामी पावसाकडे लागले असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

