Vehicle hits barricade :नागपूरहून जालन्याकडे जाणाऱ्या वाहनाचा एक्सेल तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ते रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी बॅरिकेडला धडकले. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, अपघातग्रस्त वाहनाने शुक्रवारी सकाळी अचानक पेट घेतल्याने वाहन जळून खाक झाले. ही घटना समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉरच्या चॅनल क्रमांक ३००.२ येथे घडली.

चॅनल ३००.२ वर अपघातग्रस्त वाहन जळाले; चालक सुखरूप, जीवितहानी टळली
फकीरा पठाण
मलकापूर पांग्रा : नागपूरहून जालन्याकडे जाणाऱ्या वाहनाचा एक्सेल तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ते रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी बॅरिकेडला धडकले. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, अपघातग्रस्त वाहनाने शुक्रवारी सकाळी अचानक पेट घेतल्याने वाहन जळून खाक झाले. ही घटना समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉरच्या चॅनल क्रमांक ३००.२ येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ४ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे १ वाजता वाहन क्रमांक एमएच २० ईके ६००८ नागपूरहून जालन्याकडे जात होते. मेहकर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ३००.२ जवळ अचानक वाहनाचा एक्सेल तुटला. त्यामुळे वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी बॅरिकेडला जाऊन धडकले.
या अपघातात वाहनाचे नुकसान झाले; मात्र चालक परमेश्वर उद्धवराव चव्हाण (वय ४२, रा. खुरामपूर, ता. लोणार) यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातानंतर घटनास्थळी बॅरिकेडिंग करून वाहतूक सुरळीत करण्यात आली होती.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी सुमारे ६.१० वाजता अपघातग्रस्त वाहनाला अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर येथील नियंत्रण कक्षाकडून सकाळी ६.१५ वाजता मेहकर पोलिसांना दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली. माहिती मिळताच मलकापूर येथील महामार्ग पोलीस केंद्रांतर्गत वाकी समृद्धी महामार्ग उपकेंद्राचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने वाहनाला लागलेली आग विझविली. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही. आग आटोक्यात आणल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहिली. घटनास्थळी काही काळ खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या.
घटनास्थळी डब्ल्यूपीएसआय अनिता इर्शिद, हेड कॉन्स्टेबल देवेंद्र पायघन, पोलीस कॉन्स्टेबल इरफान शेख, आकाश यादव, प्रशांत इंगळे आदींनी भेट देऊन पाहणी केली. या अपघाताची नोंद मेहकर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील कार्यवाही मेहकर पोलीस करीत आहेत.
या घटनेमुळे समृद्धी महामार्गावर वाहनांची तांत्रिक स्थिती आणि प्रवासापूर्वी वाहनांची तपासणी करण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

