Varshavas: आगर येथील तीर्थक्षेत्र विश्व शांती बुद्ध विहारात आषाढ पौर्णिमेपासून वर्षावास उत्सवाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाच्या सामूहिक वाचनालाही सुरुवात करण्यात आली आहे. धम्मप्रसार आणि बौद्ध संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला धम्मअनुयायांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

आषाढ पौर्णिमेपासून वर्षावास उत्सवाची सुरुवात; विश्व शांती बुद्ध विहारात धम्ममय वातावरण
आगर : आगर येथील तीर्थक्षेत्र विश्व शांती बुद्ध विहारात आषाढ पौर्णिमेपासून वर्षावास उत्सवाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाच्या सामूहिक वाचनालाही सुरुवात करण्यात आली आहे. धम्मप्रसार आणि बौद्ध संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला धम्मअनुयायांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
विश्व शांती बुद्ध विहारात वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याच परंपरेचा भाग म्हणून २९ जुलै रोजी आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या वर्षावास उत्सवाची सुरुवात करण्यात आली. या कालावधीत भगवान बुद्धांच्या विचारांचा प्रसार व्हावा आणि धम्माचे तत्त्वज्ञान समाजापर्यंत पोहोचावे, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वर्षावास उत्सवादरम्यान बोधाचार्य शेषराव शिरसाट हे आपल्या मधुर वाणीमधून ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे नियमित वाचन करीत असून, उपस्थित धम्मअनुयायी श्रद्धाभावाने त्याचा लाभ घेत आहेत.
तसेच, भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा अकोला यांच्या वतीने आयोजित प्रवचनमालिकेचेही आयोजन करण्यात आले असून, विविध धम्मवक्ते भगवान बुद्धांचे विचार, धम्माचे तत्त्वज्ञान आणि सामाजिक समतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणार आहेत.
या वर्षावास उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रामणेर बोधाचार्य माणीकराव पांडुरंग शिरसाट, राजरत्न तायडे, श्रामणेरी ललिता इंगोले यांच्यासह धम्मउपासिका प्रमिला शिरसाट, आम्रपाली शिरसाट, उज्वला शिरसाट, शिला ढवळे, सुनिता इंगळे, सुनंदा देवानंद शिरसाट, रत्नाबाई शिरसाट, कोकीळा शिरसाट, कांता शिरसाट, इंदुबाई शिरसाट, अनिल शिरसाट आणि दिनेश शिरसाट हे परिश्रम घेत आहेत.
याशिवाय विश्व शांती बुद्ध विहार समिती, विश्व शांती क्रीडा मंडळ तसेच स्थानिक युवकांचेही उत्सवाच्या नियोजनात आणि धम्मकार्याच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान लाभत आहे. वर्षावास उत्सवाच्या निमित्ताने परिसरात धम्ममय वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या संख्येने धम्मअनुयायी विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत.

