vehicle hits person: समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक २७१ जवळ अज्ञात वाहनाने एका व्यक्तीला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, ही घटना अपघात आहे की अन्य कोणता प्रकार, याबाबत पोलीस विविध शक्यतांचा तपास करीत आहेत.

चॅनल २७१ जवळ भीषण घटना; अपघात की घातपात? पोलिसांचा तपास सुरू
डोणगाव : समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक २७१ जवळ अज्ञात वाहनाने एका व्यक्तीला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, ही घटना अपघात आहे की अन्य कोणता प्रकार, याबाबत पोलीस विविध शक्यतांचा तपास करीत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना २ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महामार्गावर अपघात झाल्याची माहिती एका नागरिकाने पोलिसांच्या आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक ११२ वर दूरध्वनीद्वारे दिली.
माहिती मिळताच डोणगाव स्थानिक पोलिसांचे हर्षे सहगल, महामार्ग पोलीस तसेच रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह गंभीर अवस्थेत असल्याने ओळख पटविण्यात अडचणी येत असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलीस व आपत्कालीन वैद्यकीय पथकाने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मेहकर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. मृत व्यक्तीचे नाव, वय आणि राहण्याचा पत्ता अद्याप समजू शकलेला नसून, त्याची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान, धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे तसेच इतर तांत्रिक बाबींच्या आधारे घटनेचा तपास करण्यात येत आहे.
या घटनेबाबत अपघात की घातपात, अशी चर्चा परिसरात सुरू असली तरी, पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

