Mahabreaking

[breaking_news]

dry spell :डोणगाव परिसरात पावसाची मोठी उघडीप; कडक उन्हाने सोयाबीन कोमेजले

dry spell :गेल्या काही दिवसांपासून डोणगाव व लगतच्या परिसरात पावसाने मोठी उघडीप दिल्याने शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. ऐन वाढीच्या तसेच फुलोरा आणि शेंगा धरण्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात पावसाने दांडी मारल्यामुळे कडक उन्हाच्या तडाख्याने सोयाबीनची पिके शेतातच कोमेजू व सुकू लागली आहेत. त्यामुळे हाताशी आलेले पीक वाया जाण्याच्या भीतीने परिसरातील बळीराजा चिंतातूर झाला आहे.

dry spell

  ऐन शेंगा धरण्याच्या अवस्थेत पावसाने दांडी मारली; बळीराजा पुन्हा चिंतेत

डोणगाव : गेल्या काही दिवसांपासून डोणगाव व लगतच्या परिसरात पावसाने मोठी उघडीप दिल्याने शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. ऐन वाढीच्या तसेच फुलोरा आणि शेंगा धरण्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात पावसाने दांडी मारल्यामुळे कडक उन्हाच्या तडाख्याने सोयाबीनची पिके शेतातच कोमेजू व सुकू लागली आहेत. त्यामुळे हाताशी आलेले पीक वाया जाण्याच्या भीतीने परिसरातील बळीराजा चिंतातूर झाला आहे.

यावर्षी मोसमी पावसाने सुरुवातीला दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीनची पेरणी केली होती. पेरणीनंतर पिकाची वाढही चांगली झाली. मात्र, गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने वातावरणात प्रचंड उष्णता जाणवत आहे. जमिनीतील ओलावा कमी होत असून विहिरी तसेच विंधन विहिरींची पाणीपातळीही खालावली आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पावसाच्या प्रदीर्घ खंडाचा थेट परिणाम सोयाबीन पिकावर दिसून येत आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनची पाने पिवळी पडून कोमेजत आहेत, तर काही भागात पिकांची वाढ खुंटली आहे. फुलोरा व शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या प्रक्रियेवरही या परिस्थितीचा प्रतिकूल परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

“आम्ही खते आणि कीटकनाशकांच्या फवारणीसाठी मोठा खर्च केला आहे. आता पीक फुलोऱ्यात व शेंगा धरण्याच्या अवस्थेत असतानाच पाऊस गायब झाला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन आमच्यावर आर्थिक संकट ओढवेल,” अशी प्रतिक्रिया डोणगाव येथील शेतकरी विजय खरात व बुद्धू गवळी यांनी व्यक्त केली.

दरम्यान, डोणगाव परिसरात सध्या रोही (रानडुक्कर) यांची संख्याही वाढल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. रोहींचे कळप शेतात घुसून पिकांचे नुकसान करीत असल्याने आधीच पावसाच्या खंडामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे.

परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत असून कृषी विभागाने तातडीने पिकांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घ्यावा, आवश्यकतेनुसार नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे. तसेच रोहींच्या वाढत्या उपद्रवाकडे वनविभागानेही तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top