protest suspended : अंढेरा फाटा येथे अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करत असताना तहसीलदार व महसूल पथकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ सुरू असलेले महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन १० सप्टेंबर २०२६ पर्यंत स्थगित करण्यात आले आहे. संबंधित प्रकरणातील मुख्य आरोपीस १० सप्टेंबरपर्यंत अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस विभागाकडून देण्यात आल्यानंतर संघटनांनी हा निर्णय घेतला आहे.

तहसीलदारांवरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती
गजानन तिडके
देऊळगाव राजा : अंढेरा फाटा येथे अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करत असताना तहसीलदार व महसूल पथकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ सुरू असलेले महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन १० सप्टेंबर २०२६ पर्यंत स्थगित करण्यात आले आहे. संबंधित प्रकरणातील मुख्य आरोपीस १० सप्टेंबरपर्यंत अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस विभागाकडून देण्यात आल्यानंतर संघटनांनी हा निर्णय घेतला आहे.
दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी अंढेरा फाटा येथे अवैध रेती वाहतुकीवर प्रतिबंधात्मक कारवाई करत असताना देऊळगाव राजा तहसीलदार श्रीमती वैशाली डोंगरजाळ, ग्राम महसूल अधिकारी आकाश खरात, वाहनचालक संतोष भोपळे आणि शिपाई पंजाबराव ताटे यांच्या पथकावर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या व्यक्तींकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.
या प्रकरणी हर्षल अंभोरे, रा. एकलारा, ता. चिखली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपीला अद्याप अटक करण्यात न आल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, विदर्भ पटवारी संघटना, महसूल सेवक संघटना आणि मंडळ अधिकारी संघटना यांच्या वतीने दि. १९ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू करण्यात आले होते. त्यानंतर दि. २४ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या दालनात संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीस महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर हटकर, जिल्हा सरचिटणीस गजानन मोतेकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत वाघ, जिल्हाधिकारी कार्यालय अध्यक्ष चेतन मोहने, विदर्भ पटवारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय धोंडगे, तहसीलदार-नायब तहसीलदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, तालुकाध्यक्ष शिवानंद आंधळे, महसूल सेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. खांदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कव्हळे, उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा श्री. खडसे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, देऊळगाव राजा श्री. ठोसरे उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पोलीस विभागाच्या वतीने या प्रकरणातील मुख्य आरोपीस दि. १० सप्टेंबर २०२६ पर्यंत अटक करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. शेतकरी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना कामबंद आंदोलनामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन संबंधित संघटनांनी १० सप्टेंबरपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व महसूल कर्मचारी दि. २ सप्टेंबर २०२६ पासून नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहून शासकीय कामकाज सुरू करतील. मात्र, दि. १० सप्टेंबरपर्यंत मुख्य आरोपीस अटक न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निश्चित करण्यात येईल, अशी माहिती महसूल कर्मचारी संघटना व संबंधित संघटनांच्या वतीने देण्यात आली आहे.
महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनांची मागणी
अवैध रेती तसेच इतर गौण खनिजांच्या वाहतुकीवर कारवाई करताना महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटना गंभीर असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासन व पोलीस विभागाने महसूल कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे. तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

