Unable to bear the shock : तालुक्यातील मेहुना राजा येथे पत्नीच्या निधनानंतर मानसिक खचलेल्या एका ७२ वर्षीय वृध्दाने गळफास घेवून आपले जीवनही संपविले, या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. दीर्घ सहजीवनानंतर पत्नीच्या जाण्याने ते खोल दुःखात होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. तुकाराम महादू कदम (वय ७२, रा. मेहुना राजा) असे मृतक वृद्धाचे नाव आहे.

पत्नीच्या तेरवीच्या पूर्वसंध्येलाच घेतला जगाचा निरोप : परिसरात व्यक्त होतेय हळहळ
गजानन तिडके
देऊळगाव राजा : तालुक्यातील मेहुना राजा येथे पत्नीच्या निधनानंतर मानसिक खचलेल्या एका ७२ वर्षीय वृध्दाने गळफास घेवून आपले जीवनही संपविले, या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. दीर्घ सहजीवनानंतर पत्नीच्या जाण्याने ते खोल दुःखात होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. तुकाराम महादू कदम (वय ७२, रा. मेहुना राजा) असे मृतक वृद्धाचे नाव आहे.
कुटुंबाच्या माहितीनुसार, त्यांची पत्नी कचराबाई कदम या गेल्या वर्षभरापासून आजारामुळे अंथरुणाला खिळल्या होत्या. सुमारे काही दिवसांपूर्वी त्यांचे निधन झाले होते. या घटनेनंतर तुकाराम कदम हे शांत, अबोल झाले होते आणि पत्नीच्या आठवणींनी व्यथित असल्याचे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सांगितले.तुकाराम कदम यांच्याकडे अल्पशेती असून त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. त्यांच्या पश्चात एक मुलगा व दोन विवाहित मुली असा परिवार आहे. पत्नीच्या निधनानंतर ते भावनिकदृष्ट्या खूप खचले होते, असे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे.
दि. २९ मे रोजी सकाळी त्यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कळविले. प्रकरणी मर्ग नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहेत. पत्नीच्या तेरवीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे गावात दुःखाचे वातावरण असून, दीर्घ सहजीवनातील भावनिक नात्याची चर्चा परिसरात होत आहे.

