Guidance for Police Officers : गुन्ह्यांच्या तपासात अचूकता वाढवून दोषसिद्धीचे प्रमाण उंचावण्यासाठी तसेच तपास प्रक्रियेत कायदेशीर बाबींची काटेकोर अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने पोलीस उपविभागीय कार्यालयांतर्गत देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विधी सेवा विभागाशी संबंधित मान्यवरांनी सहभाग घेतला.

दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी देऊळगाव राजात पोलीस विभागाची कार्यशाळा संपन्न
गजानन तिडके
देऊळगाव राजा : गुन्ह्यांच्या तपासात अचूकता वाढवून दोषसिद्धीचे प्रमाण उंचावण्यासाठी तसेच तपास प्रक्रियेत कायदेशीर बाबींची काटेकोर अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने पोलीस उपविभागीय कार्यालयांतर्गत देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विधी सेवा विभागाशी संबंधित मान्यवरांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम या होत्या, तर विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. अनिल शेळके यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी, सिंदखेड राजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष इंगळे, अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे, पोलीस उपनिरीक्षक क्रांती ढाकणे, व्ही. एस. पटेल, राजकुमार मोहोळकर, नितीन मिंड तसेच पोलीस अंमलदार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी तपास प्रक्रियेदरम्यान घ्यावयाची खबरदारी, गोपनीयता, पुरावे संकलन, वेळोवेळी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया आणि तपासातील शिस्त याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. अनिल शेळके यांनी तपासातील छोट्या चुका आरोपींना कशाप्रकारे न्यायालयीन लाभ मिळवून देतात, याचे उदाहरणांसह विश्लेषण केले. घटनास्थळ पंचनामा करताना बारकाईने निरीक्षण करणे, पुरावे योग्यरीत्या नोंदविणे, दस्तऐवजीकरणातील अचूकता आणि तपासाची सुसंगत कार्यपद्धती यावर त्यांनी विशेष भर दिला.
ही कार्यशाळा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये दोषसिद्धी वाढीसाठी आवश्यक तपास पद्धती, कायदेशीर बाबी आणि न्यायालयीन प्रक्रियेत पुराव्यांचे महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

