Dongaon Gram Panchayat : डोणगाव ग्रामपंचायतीतील मनमानी व गलथान कारभार दोन कर्मचाऱ्यांच्या अंगलट आला असून संबंधित लिपिकांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. मात्र ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार कायम असतानाही जिल्हा परिषद प्रशासनाकडून पुढील कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.

डोणगाव: डोणगाव ग्रामपंचायतीतील मनमानी व गलथान कारभार दोन कर्मचाऱ्यांच्या अंगलट आला असून संबंधित लिपिकांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. मात्र ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार कायम असतानाही जिल्हा परिषद प्रशासनाकडून पुढील कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.
ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे नागरिक वैतागले असून विविध समस्यांचा डोंगर उभा राहिल्याची भावना व्यक्त होत आहे. दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई झाल्यास ग्रामपंचायत प्रशासनात सुधारणा होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. डोणगाव ग्रामपंचायत आणि येथील कारभार यापूर्वीही अनेकदा चर्चेत राहिला असून पूर्वी ग्रामपंचायत अधिकारी निलंबित झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यावेळी मात्र दोन लिपिकांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली.
डोणगाव येथील ग्रामपंचायत कारभाराबाबत अमोल धोटे यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. चौकशी अहवाल ३० जानेवारी रोजी प्राप्त झाला असून त्यात ग्रामपंचायत अधिकारी व्ही. के. दांडगे यांच्याविरुद्ध गंभीर बाबी आढळल्याचे नमूद करण्यात आले. जिल्हा परिषद सेवा नियम १९६४ मधील नियम (३) नुसार कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते; मात्र पुढील कारवाई झालेली नाही.
तक्रारीनुसार, सामान्य निधीची रोकड वहीतील नोंदी, दररोज वसूल रक्कम ग्रामनिधीत जमा न करता खर्च करणे, ८८ हजार २५५ रुपयांचा नियमबाह्य खर्च, एकापेक्षा अधिक बँक खाती उघडणे, नमुना क्रमांक ५ व ७ मधील तफावत, रोकड वही अपूर्ण ठेवणे, स्वाक्षरीतील बदल तसेच १५व्या वित्त आयोगाच्या मानधन खर्चातील अनियमितता आदी मुद्द्यांवर चौकशी करण्यात आली होती.
दरम्यान, १८ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांच्या आदेशाने ग्रामपंचायत लिपिक श्याम खोटे व प्रदीप परमाळे यांना बडतर्फ करण्यात आले. २०२३–२४ च्या लेखापरीक्षणात १ लाख १० हजार ४२ रुपये ग्रामपंचायत खात्यात जमा न करता खर्च केल्याचा ठपका तसेच कामकाजातील अनियमितता ही बडतर्फीची कारणे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
एकीकडे दोन लिपिकांवर तत्पर कारवाई करण्यात आली असली, तरी चौकशी समितीने दोषी ठरवलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी या कारवाईविरोधात वरिष्ठ पातळीवर तसेच न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.
डोणगावात शिवजयंती मिरवणूक उत्साहात; मान्यवरांच्या हस्ते पूजन, पोलिसांचा चोख बंदोबस्त
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

