Two arrested : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बुलढाणा पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच मोहिमेअंतर्गत नांदूरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. आरोपींकडून देशी पिस्टल, मोबाईल व मोटारसायकल असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर स्थागुशाची धडक कारवाई; पिस्टल बाळगणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात
बुलढाणा : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बुलढाणा पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच मोहिमेअंतर्गत नांदूरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. आरोपींकडून देशी पिस्टल, मोबाईल व मोटारसायकल असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश राज्याच्या सीमेलगत असलेल्या सोनाळा, तामगाव, जळगाव जामोद आणि नांदूरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत देशी बनावटीची अग्निशस्त्रे, काडतुसे व इतर हत्यारांची तस्करी, खरेदी-विक्री तसेच अवैधरीत्या अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.
या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर लक्ष ठेवून होते. दरम्यान, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, नांदूरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमगाव फाट्याजवळ काही व्यक्ती अवैध व विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल बाळगून आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निमगाव फाट्याजवळील माऊली बार येथे धाड टाकली. या कारवाईत रविंद्र विठ्ठल वेरुळकार (वय २९, रा. येरळी, ता. नांदूरा) आणि पवन कौतीकराव वेरुळकार (वय ३०, रा. येरळी, ता. नांदूरा, जि. बुलढाणा) यांना ताब्यात घेण्यात आले.
८५ हजारांचा मुद्देमाल जप्त
आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी देशी बनावटीचे एक अग्निशस्त्र (पिस्टल) किंमत ४५ हजार रुपये, होंडा शाईन मोटारसायकल किंमत ३० हजार रुपये आणि एक मोबाईल फोन किंमत १० हजार रुपये, असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी सरकारतर्फे दाखल फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध नांदूरा पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट कलम ३, ७, २५ सह कलम १२३, १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नांदूरा पोलीस करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप व अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पोहेकॉ. विजय वारुळे, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश सनगाळे, अमोल वनारे, सतीश नाटेकर, मनोज खरडे, चालक पोहेकॉ. समाधान टेकाळे, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा, तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल कैलास ठोंबरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सण-उत्सवांच्या काळात अवैध शस्त्रांचा वापर होऊ नये आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करण्यात येत आहेत.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

