4 killers arrested : किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तढेगाव शिवारात मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाच्या हत्येचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या पाच तासांत छडा लावला. मृताची ओळख पटवून पोलिसांनी या हत्येप्रकरणी चार आरोपींना जेरबंद केले आहे. जुन्या वादातून मृतक उमेश रमेश परिहार (वय ३८, रा. साकेगाव, ता. चिखली) याची हत्या करण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. याप्रकरणी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वादातून ‘सुपारी’ देऊन उमेश परिहारची हत्या; स्थानिक गुन्हे शाखेने चार आरोपींना पकडले
गजानन तिडके
देऊळगाव राजा : किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तढेगाव शिवारात मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाच्या हत्येचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या पाच तासांत छडा लावला. मृताची ओळख पटवून पोलिसांनी या हत्येप्रकरणी चार आरोपींना जेरबंद केले आहे. जुन्या वादातून मृतक उमेश रमेश परिहार (वय ३८, रा. साकेगाव, ता. चिखली) याची हत्या करण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. याप्रकरणी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश परिहार हा दि. ९ सप्टेंबर रोजी आपल्या मुलांना भेटण्यासाठी मडाखेड येथे गेला होता. दरम्यान, दि. ११ सप्टेंबर रोजी उमेश हा तढेगाव शिवारात रस्त्यालगत असलेल्या सोयाबीनच्या शेतात मृतावस्थेत पडल्याची माहिती त्याचे वडील रमेश सांडूसिंग परिहार (वय ६५, रा. साकेगाव) यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता उमेशच्या चेहऱ्यावर सूज, तोंडातून व नाकातून रक्तस्राव तसेच डोक्याला मुका मार लागल्याचे दिसून आले.
या घटनेनंतर रमेश परिहार यांनी गणेश राजपूत (रा. उतरादा) याने साथीदारांच्या मदतीने आपल्या मुलाचा घातपात केल्याचा संशय व्यक्त केला. त्यांच्या तक्रारीवरून किनगाव राजा पोलीस ठाण्यात अप. क्र. ३२६/२०२६, कलम १०३(१) भा.न्या.सं. अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याची उकल करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भौतिक तसेच तांत्रिक पद्धतीने तपासाला सुरुवात केली. समांतर तपास करताना पोलिसांनी मृतकाची ओळख पटविण्यासोबतच हत्येमागील आरोपींचा माग काढला.
तपासादरम्यान पोलिसांनी गणेश मोतीसिंग राजपूत (वय ३९, रा. उतरादा, ता. चिखली), गणेश पुंजाजी काळे (वय ४२, रा. सारस्वती, ता. लोणार), नयीम खाँ उमर खाँ पठाण (वय ५०, रा. ईसोली, ता. चिखली) आणि सागर प्रकाश पवार (वय ५०, रा. उतरादा, ता. चिखली) या चार आरोपींना ताब्यात घेतले.
जुन्या वादातून हत्येचा कट
पोलिसांच्या तपासानुसार, मृतक उमेश परिहार आणि आरोपी गणेश राजपूत यांच्यात बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. या वादातून दोघांमध्ये अनेकदा भांडणेही झाली होती. याच वादातून उमेश परिहारचा कायमचा काटा काढण्याचा कट रचण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कटानुसार गणेश राजपूत याने सागर पवारच्या माध्यमातून नयीम खाँ पठाण आणि गणेश काळे यांना उमेश परिहार याची हत्या करण्यासाठी १ लाख ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
लोणारला नेऊन दारू पाजली
दि. ९ सप्टेंबर रोजी गणेश राजपूत आणि गणेश काळे यांनी उमेश परिहार याला सोबत घेतले. त्यानंतर साखरखेर्डा येथून सागर पवार आणि नयीम खाँ पठाण यांना सोबत घेऊन ते लोणार येथे गेले. तेथे सर्वांनी जेवण केले. त्यानंतर उमेशला दारू पाजण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, त्यानंतर गणेश काळे याने उमेशसोबत राहून दारूच्या बाटलीत विषारी पदार्थ मिसळला आणि ती दारू उमेशला पाजली. त्यातून उमेशचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह तढेगाव, ता. सिंदखेड राजा येथील शिवारातील घनश्याम कुटे यांच्या सोयाबीनच्या शेतात टाकण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि देऊळगाव राजा उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर, पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, सफौ. राजेंद्र अंभोरे, पोहेकॉ. शरदचंद्र गिरी, जगदेव टेकाळे, पुरुषोत्तम आघाव, युवराज राठोड, पोलीस कॉन्स्टेबल अमोल अंभोरे, राजेंद्र गडकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल पूजा जाधव, चालक पोलीस कॉन्स्टेबल विलास भोसले, पोहेकॉ. राजू आडवे (तांत्रिक विश्लेषण विभाग, बुलढाणा), पीएसआय सुरेश जारवाल, वाचक, पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत ठाकरे (उपविभागीय पोलीस अधिकारी, देऊळगाव राजा), पोलीस कॉन्स्टेबल उमेश राजपूत (ता.जि.वि.शा., चिखली), तसेच सुभाष गिते, गणेश वारकरी, मिलिंद सानपसारे, संदीप डोंगरे (पोलीस ठाणे किनगाव राजा) यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर, पोलीस ठाणे किनगाव राजा, करीत आहेत.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

