Tribute paid : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २६ जुलै रोजी ग्रामीण रुग्णालय, बीबी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते झाले. समाजोपयोगी उपक्रम म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले.

अजितदादा पवार जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर; समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांची साथ
रमेश खंडागळे
बीबी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २६ जुलै रोजी ग्रामीण रुग्णालय, बीबी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते झाले. समाजोपयोगी उपक्रम म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष ॲड. नाझिर काझी, पक्षाचे ज्येष्ठ नेते आंधळे मामा, विष्णू केंद्रे, सुनील केंद्रे, अंबादास खंड, विठ्ठल आटोळे, अरविंद चव्हाण, संतोष बनकर, गजानन काकडे, गजानन मुर्तडकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार मनोजभाऊ कायंदे यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचा गौरव केला. राज्याच्या विकासासाठी, शेतकरी, कष्टकरी, युवक आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आणि राबविलेली विकासकामे प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. वाढदिवस व जयंतीसारखे दिवस समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरे करणे हीच संबंधित व्यक्तीला खरी आदरांजली असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार कायंदे यांनी सिंदखेड राजा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला. “सिंदखेड राजा मतदारसंघ बारामतीच्या धर्तीवर विकसित करणे, प्रत्येक गावापर्यंत विकास पोहोचविणे, आरोग्य सुविधांचा विस्तार, दर्जेदार रस्त्यांचे जाळे उभारणे, पिण्याच्या पाण्याच्या योजना प्रभावीपणे राबविणे तसेच शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. जनतेने माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही,” असे त्यांनी सांगितले.
रक्तदान शिबिरात वैद्यकीय पथकाने रक्तदात्यांची आरोग्य तपासणी करून सुरक्षित पद्धतीने रक्तसंकलन केले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि समाजात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

