Mahabreaking

[breaking_news]

Transformer shuts down: अवघ्या ३० मिनिटांत ट्रान्सफॉर्मर पुन्हा बंद; किल्ला परिसरातील नागरिकांची रात्र अंधारात!

Transformer shuts down: शहरातील अर्बन क्षेत्रातील वीज व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला असून, किल्ला परिसरातील नागरिकांना सलग वीज खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता बिघडलेला ट्रान्सफॉर्मर तब्बल १२ तासांच्या प्रयत्नांनंतर बदलून वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडताच अवघ्या ३० मिनिटांत ट्रान्सफॉर्मर पुन्हा बंद पडला आणि संपूर्ण परिसर पुन्हा अंधारात बुडाला.

Transformer

   बाळापूरच्या अर्बन वीज व्यवस्थेचा बोजवारा; १२ तासांनी आलेली वीज पुन्हा अर्ध्या तासात गुल

बाळापूर : शहरातील अर्बन क्षेत्रातील वीज व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला असून, किल्ला परिसरातील नागरिकांना सलग वीज खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता बिघडलेला ट्रान्सफॉर्मर तब्बल १२ तासांच्या प्रयत्नांनंतर बदलून वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडताच अवघ्या ३० मिनिटांत ट्रान्सफॉर्मर पुन्हा बंद पडला आणि संपूर्ण परिसर पुन्हा अंधारात बुडाला.

वीजपुरवठा खंडित झाल्याने किल्ला परिसरातील नागरिकांना उकाडा आणि डासांच्या प्रचंड त्रासाला रात्रभर सामोरे जावे लागले. घरात झोपणेही कठीण झाल्याने अनेक नागरिक रात्री उशिरापर्यंत गल्ली-बोळात व रस्त्यावर बसलेले किंवा फिरताना दिसून आले. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष गैरसोय झाली.

दरम्यान, बिघाड दुरुस्त करून शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, काही वेळासाठी वीज सुरू झाल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांत पुन्हा बिघाड झाल्याने नागरिकांचा महावितरणच्या दुरुस्ती व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. यावेळी वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर तो पुन्हा खंडित होणार नाही, याची खात्री कोण देणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

१५ ते १८ दिवसांपासून नियमित अभियंता नाही!

अर्बन क्षेत्रातील नियमित कनिष्ठ अभियंता रिलिव्ह होऊन १५ ते १८ दिवस उलटले आहेत. अद्याप नवीन कनिष्ठ अभियंत्याची नियुक्ती झालेली नसून, प्रभारी अधिकाऱ्यावर कारभार सोपविण्यात आला आहे. मात्र, नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अर्बन क्षेत्रातील वीज यंत्रणा अक्षरशः ‘प्रभारी’ अवस्थेत चालत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांना फोन; मात्र प्रतिसाद नाही?

बिघाड झाल्यानंतर संबंधित वायरमन आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अनेकदा फोनला प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वीजबिल वसुलीच्या वेळी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी तत्परता दाखविली जाते; मात्र ग्राहक अंधारात असताना तक्रारींचे निराकरण करण्यासाठी हीच तत्परता का दिसत नाही, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

नियमित कनिष्ठ अभियंता, मनुष्यबळाची मागणी

किल्ला परिसरासह बाळापूर अर्बन क्षेत्रातील वीज व्यवस्था सक्षम करण्यासाठी नियमित कनिष्ठ अभियंत्याची तातडीने नियुक्ती करावी, पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यास तत्काळ पर्यायी व्यवस्था उभी करावी, अशी मागणी नागरिकांनी अकोला येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. बिल वसुलीत तत्परता आणि वीजसेवा देताना दिरंगाईची दुहेरी भूमिका थांबवून ग्राहकांना अखंडित व विश्वासार्ह वीजपुरवठा द्यावा, अशी संतप्त भावना किल्ला परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top