Eid-e-Milad: आगामी ईद-ए-मिलाद उत्सव शांततेत, शिस्तीत आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत पार पाडण्यासाठी अकोला पोलीस दलाच्या वतीने जुलूस कमिटी, मुस्लिम समाजातील पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिकांची विशेष बैठक २१ ऑगस्ट रोजी पोलीस लॉन, अकोला येथे घेण्यात आली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीला सुमारे ३०० नागरिक उपस्थित होते.

ईद-ए-मिलाद जुलूसासाठी पोलिसांची कडक तयारी; ३०० नागरिकांच्या बैठकीत शांततेचा संदेश
बाळापूर : आगामी ईद-ए-मिलाद उत्सव शांततेत, शिस्तीत आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत पार पाडण्यासाठी अकोला पोलीस दलाच्या वतीने जुलूस कमिटी, मुस्लिम समाजातील पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिकांची विशेष बैठक २१ ऑगस्ट रोजी पोलीस लॉन, अकोला येथे घेण्यात आली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीला सुमारे ३०० नागरिक उपस्थित होते.
बैठकीत कायदा व सुव्यवस्था, जुलूस मार्ग, वाहतूक नियोजन, बॅनर, ध्वनिक्षेपक तसेच उत्सवादरम्यान घ्यावयाच्या खबरदारीबाबत पोलिसांनी सविस्तर मार्गदर्शन केले. आक्षेपार्ह बॅनर लावू नयेत, तसेच आक्षेपार्ह अथवा वादग्रस्त गाणी वाजवू नयेत, अशा स्पष्ट सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या.
उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी धोकादायक व्यक्ती आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक तसेच तडीपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. शहरात आवश्यक त्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीचे प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी केले. यावेळी सैय्यद जकीमिया नख्शबंदी, मुफ्ती हाजी इस्माईल शहा, जुलूस कमिटीचे अध्यक्ष हाजी मेहमूद खान उर्फ हाजी मुदाम यांच्यासह मुस्लिम समाजातील पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी ईद-ए-मिलादचा उत्सव शांतता, शिस्त आणि बंधुभावाच्या वातावरणात साजरा करण्याची भूमिका व्यक्त केली.
‘उत्सव उत्साहात साजरा करूया; मात्र शांतता, शिस्त, बंधुभाव आणि कायद्याचा आदर कायम ठेवूया,’ असा संदेश बैठकीत देण्यात आला. अकोला शहरातील शांतता व सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि नागरिकांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
कोणताही अनुचित प्रकार अथवा संशयास्पद घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी तातडीने ११२ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले. आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक रहीम शेख, ठाणेदार, अकोट फाईल यांनी केले.

