Mahabreaking

[breaking_news]

Tragic incident :अडाण नदीत दुर्दैवी दुर्घटना; आंघोळीसाठी गेलेल्या आतेभाऊ-मामेभावाचा बुडून मृत्यू

Tragic incident : अधिक महिन्यानिमित्त पवित्र स्नानासाठी अडाण नदीच्या पात्रात गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. १४) सकाळी गोमुखेश्वर संस्थान परिसरात घडली. शुभम अमोल धोंडे (वय १४, रा. इंझोरी) आणि त्याचा आतेभाऊ दर्शन सुनील वावगे (वय २०, रा. भातकुली, जि. अमरावती) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे दोन्ही गावांवर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Tragic incident

गोमुखेश्वर संस्थान परिसरात शोकांतिका; खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोन युवकांचा जीव गेला

मानोरा : अधिक महिन्यानिमित्त पवित्र स्नानासाठी अडाण नदीच्या पात्रात गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. १४) सकाळी गोमुखेश्वर संस्थान परिसरात घडली. शुभम अमोल धोंडे (वय १४, रा. इंझोरी) आणि त्याचा आतेभाऊ दर्शन सुनील वावगे (वय २०, रा. भातकुली, जि. अमरावती) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे दोन्ही गावांवर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या अधिक महिन्याच्या धार्मिक पर्वानिमित्त रविवारी सकाळी शुभम आणि दर्शन हे दोघे गोमुखेश्वर संस्थान परिसरातील अडाण नदीच्या पात्रात स्नान करण्यासाठी गेले होते. स्नान उरकल्यानंतर दोघेही नदीत पोहण्यासाठी उतरले. मात्र, नदीपात्रातील खोल गड्ड्याचा अंदाज न आल्याने ते अचानक खोल पाण्यात गेले आणि भोवऱ्यात अडकले.

क्षणार्धात दोघेही पाण्याखाली ओढले जाऊ लागल्याने नदीकाठावर खेळणाऱ्या काही मुलांनी आरडाओरडा करून मदतीसाठी हाक मारली. मुलांचा आवाज ऐकताच नदीत मासेमारी करणारे स्थानिक कोळी बांधव आणि परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. त्यांनी तातडीने शोधमोहीम सुरू करून दोघांना पाण्याबाहेर काढले.

दरम्यान, दुर्घटनेची माहिती गावात पोहोचताच धोंडे आणि वावगे कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ नदीकाठावर जमा झाले. गावातील युवक विशाल वानखेडे यांनी तत्काळ आपले चारचाकी वाहन उपलब्ध करून दिले. बेशुद्ध अवस्थेतील शुभम आणि दर्शन यांना तातडीने कारंजा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांनाही उपचारापूर्वीच मृत घोषित केले. ही दुःखद बातमी समजताच रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

शुभम हा अल्पवयीन आणि शिक्षण घेत असलेला विद्यार्थी होता, तर दर्शन हा तरुण वयातच कुटुंबाचा आधारस्तंभ मानला जात होता. एका क्षणात दोघांचेही आयुष्य संपल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेमुळे गोमुखेश्वर संस्थान परिसरातील नदीपात्रातील धोकादायक खोल भागांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धार्मिक स्थळांवर आणि नदीकाठच्या भागांमध्ये सुरक्षा उपाययोजना वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे इंझोरी, भातकुली आणि परिसरातील गावांमध्ये शोककळा पसरली असून दोन्ही युवकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top