Alegaon murder case solved : आलेगाव येथे रविवारी सकाळी घडलेल्या १७ वर्षीय यश गजानन गिरे यांच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या सहा तासांत छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), बाळापूर उपविभागीय पोलीस कार्यालय आणि चान्नी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईमुळे आरोपींना फरार होण्यापूर्वीच जेरबंद करण्यात यश आले.

एलसीबी आणि चान्नी पोलिसांची संयुक्त कारवाई यशस्वी :अमरावतीत पळून जाण्याच्या तयारीत आरोपी ताब्यात
निशांत गवई
पातूर : आलेगाव येथे रविवारी सकाळी घडलेल्या १७ वर्षीय यश गजानन गिरे यांच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या सहा तासांत छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), बाळापूर उपविभागीय पोलीस कार्यालय आणि चान्नी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईमुळे आरोपींना फरार होण्यापूर्वीच जेरबंद करण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ जून रोजी सकाळच्या सुमारास आलेगाव येथील वसंतराव नाईक शाळेसमोरील शेकापूर फाटा परिसरात यश गजानन गिरे (वय १७) याच्यावर गावातीलच काही तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. कौटुंबिक वादातून झालेल्या या हल्ल्यात यश याच्यावर चाकूने सपासप वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या यशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा, बाळापूर उपविभागीय पोलीस कार्यालय आणि चान्नी पोलीस स्टेशनची स्वतंत्र अशी तीन पथके कार्यरत करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि वेगवान तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.
या कारवाईत चैतन्य जगदीश काळपांडे (वय १९, रा. आलेगाव) आणि एका १६ वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमरावती येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना दर्यापूर रोडवरील आपातापा परिसरातून ताब्यात घेतले. तर या प्रकरणातील तिसरा आरोपी जतीन राजेश क्षीरसागर (वय १९, रा. विवरा) याला चान्नी पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या तिन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाई आणि सखोल तपासासाठी पातूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. खुनामागील नेमके कारण, वादाचे स्वरूप आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, अल्पवयीन मुलाच्या निर्घृण हत्येमुळे आलेगाव परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी अत्यंत कमी वेळेत आरोपींना अटक केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, चान्नी पोलीस ठाण्याचे ठाणेदार गंगाधर दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल जाधव, निलेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक माजिद पठाण तसेच स्थानिक गुन्हे शाखा व चान्नी पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

