Mahabreaking

[breaking_news]

  Dhondi Dhondi Pani De :पावसासाठी वाडेगावात धोंडी धोंडी पाणी देचा पारंपरिक विधी; वरुणराजाला ग्रामस्थांचे साकडे

Dhondi Dhondi Pani De : बाळापूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पेरणी झाल्यानंतर पावसाअभावी पिके कोमेजण्याची भीती व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर वाडेगाव परिसरातील ग्रामस्थांनी वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी पारंपरिक ‘धोंडी धोंडी पाणी दे’ हा लोकपरंपरेतील विधी साजरा करून पावसासाठी साकडे घातले.

Dhondi Dhondi Pani De

   पावसाने ओढ दिल्याने वाडेगावात लोकपरंपरेला उजाळा; ‘धोंडी धोंडी पाणी दे’ची मिरवणूक

राहुल सोनोने

वाडेगाव : बाळापूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पेरणी झाल्यानंतर पावसाअभावी पिके कोमेजण्याची भीती व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर वाडेगाव परिसरातील ग्रामस्थांनी वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी पारंपरिक ‘धोंडी धोंडी पाणी दे’ हा लोकपरंपरेतील विधी साजरा करून पावसासाठी साकडे घातले.

ग्रामीण भागात पावसासाठी केली जाणारी ही प्राचीन लोकपरंपरा आजही जपली जात असल्याचे यानिमित्ताने दिसून आले. गावातील लहान मुले, युवक आणि पुरुष यांनी कमरेला कडुनिंबाच्या पानांच्या डहाळ्या बांधून निसर्गाशी एकरूप होण्याचे प्रतीकात्मक दर्शन घडविले. हिंदू संस्कृतीत कडुनिंबाला पवित्र आणि आरोग्यदायी मानले जात असल्याने या विधीत त्याला विशेष महत्त्व आहे.

कडुनिंबाच्या पानांनी सजविलेले मुसळ हातात घेऊन गावातून पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. यावेळी “धोंडी धोंडी पाणी दे, दाळ-दाणा पिकू दे…”, “काळा खजुरा, खोबऱ्याची वाटी, बेडकिण बांधली पाण्यासाठी…” तसेच “उत्तम शेती, मध्यम व्यापार…” अशा पारंपरिक घोषणा देत ग्रामस्थांनी पावसासाठी प्रार्थना केली. ढोल-ताशे व वाजंत्रीच्या गजरात ही मिरवणूक गावातील प्रमुख रस्ते आणि बाजारपेठेतून काढण्यात आली.

मिरवणूक प्रत्येक घरासमोर पोहोचताच महिलांनी सहभागींच्या अंगावर हंडाभर पाणी टाकून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर हळद-कुंकू लावून विधीपूर्वक पूजन करण्यात आले. या अनोख्या लोकपरंपरेत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

पावसाअभावी चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी वरुणराजा लवकरच प्रसन्न होऊन परिसरात समाधानकारक पाऊस पडावा आणि खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळावे, अशी सामूहिक प्रार्थना यावेळी केली. ग्रामीण संस्कृती, श्रद्धा आणि निसर्गाशी असलेले भावनिक नाते अधोरेखित करणारा हा पारंपरिक विधी ग्रामस्थांच्या एकोप्याचेही प्रतीक ठरला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top