ACBs trap : आसलगाव ग्रामपंचायतीअंतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांच्या बिलाची रक्कम मंजूर करून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचायत समिती जळगाव जामोद येथील विस्तार अधिकारी संदीप उत्तमराव मोरे (वय ५२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी (१५ जुलै) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे पंचायत समिती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

जळगाव जामोद पंचायत समितीत एसीबीचा यशस्वी सापळा, आसलगावच्या विकासकामांच्या बिलासाठी मागितली लाच
बुलढाणा : आसलगाव ग्रामपंचायतीअंतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांच्या बिलाची रक्कम मंजूर करून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचायत समिती जळगाव जामोद येथील विस्तार अधिकारी संदीप उत्तमराव मोरे (वय ५२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी (१५ जुलै) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे पंचायत समिती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बांधकाम कंत्राटदार असून त्यांनी सन २०२५-२६ या कालावधीत आसलगाव ग्रामपंचायतीअंतर्गत दोन नाली बांधकामे आणि एक पेव्हर ब्लॉक रस्त्याचे काम पूर्ण केले होते. या तिन्ही कामांच्या बिलाची रक्कम मंजूर करून देण्यासाठी विस्तार अधिकारी संदीप मोरे यांनी एकूण बिलाच्या तीन टक्के प्रमाणे २५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदाराने ३ जुलै २०२६ रोजी अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. तक्रारीची प्राथमिक पडताळणी करण्यात आल्यानंतर एसीबीने सापळा रचला. १५ जुलै रोजी पंचांसमक्ष झालेल्या पडताळणीत आरोपीने तीन टक्के कमिशनच्या स्वरूपात लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सापळा कारवाईदरम्यान आरोपी संदीप मोरे यांनी तक्रारदाराला २५ हजार रुपयांची लाच स्वतःच्या खासगी वाहनात ठेवण्यास सांगितले. तक्रारदाराने पंचांसमक्ष रक्कम दिल्यानंतर आरोपीने ती स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राजेश राठोड यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक रविंद्र सहारे व पोलीस निरीक्षक स्वप्नील निराळे यांनी केली. या कारवाईत पोलीस अंमलदार अभय वाघ, वैभव जायले, मोहन ठाणेकर तसेच चालक अंमलदार राजेश बहीरट यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. अशा तक्रारींवर तातडीने कारवाई केली जाईल, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

