25 quintals of onions : बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिंचोली गणू येथील एका महिला शेतकऱ्याचा पंचवीस क्विंटल कांदा घेऊन व्यापारी पसार झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महिला शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचा आरोप
राहुल सोनोने
वाडेगाव : बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिंचोली गणू येथील एका महिला शेतकऱ्याचा पंचवीस क्विंटल कांदा घेऊन व्यापारी पसार झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली गणू येथील कांदा उत्पादक महिला शेतकरी सौ. अनिता पारवे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “शाह” नावाच्या कांदा व्यापाऱ्याशी दि. ९ मे रोजी प्रति क्विंटल ५०० रुपये दराने कांद्याचा व्यवहार ठरला होता. त्यानुसार महिला मजूर बोलावून कांदा भरून देण्यात आला.
कांद्याचे एकूण वजन २५ क्विंटल झाले असून त्याची किंमत १२ हजार ५०० रुपये इतकी होती. तसेच कांदा भरणाऱ्या महिला मजुरांची मजुरी प्रत्येकी ४०० रुपये प्रमाणे एकूण ४ हजार रुपये होती. अशाप्रकारे व्यापाऱ्याकडे एकूण १६ हजार ५०० रुपये देणे बाकी होते.तक्रारीनुसार, व्यापाऱ्याने “सध्या माझ्याकडे पैसे नाहीत, सकाळी फोन-पे द्वारे पैसे पाठवतो,” असे सांगितले होते. मात्र दुसऱ्या दिवशीही पैसे पाठवले नाहीत. त्यानंतर संध्याकाळी पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले, परंतु त्यानंतरही रक्कम न मिळाल्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संबंधित व्यापाऱ्याचा मोबाईल बंद आढळला.दरम्यान, काही शेतकरी शेलूबाजार येथील व्यापाऱ्याच्या घरी गेले असता तो घरातून पसार झाल्याचे निदर्शनास आले. तसेच ज्या ट्रॅक्टरमध्ये कांदा भरला होता त्या चालकाकडून माहिती घेतली असता सदर कांदा अकोला येथील धान्य बाजारात विक्री केल्याचे समोर आले आहे.या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचा आरोप करत संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून नुकसानभरपाईची रक्कम मिळवून द्यावी, अशी मागणी महिला शेतकरी सौ. अनिता पारवे यांनी तक्रारीतून केली आहे.

