Mahabreaking

[breaking_news]

SP E-Samvad Initiative Launched :आता पोलीस अधीक्षकांशी घरबसल्या ऑनलाईन संवाद ; ‘SP ई-संवाद’ उपक्रम सुरू

SP E-Samvad Initiative Launched :नागरिकांना त्यांच्या तक्रारी, समस्या आणि सूचना सुलभ, जलद व पारदर्शक पद्धतीने मांडता याव्यात यासाठी अकोला पोलीस दलाने “SP ई-संवाद” हा अभिनव ऑनलाईन उपक्रम सुरू केला आहे. पोलीस अधीक्षक  अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या सुविधेमुळे आता नागरिकांना प्रत्यक्ष पोलीस अधीक्षक कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नसून घरबसल्या ऑनलाईन माध्यमातून थेट संवाद साधता येणार आहे.

SP E-Samvad Initiative Launched

 अकोला पोलिसांचा डिजिटल पुढाकार; नागरिकांना ऑनलाईन तक्रार मांडण्याची सुविधा

संजय तायडे

अकोला : नागरिकांना त्यांच्या तक्रारी, समस्या आणि सूचना सुलभ, जलद व पारदर्शक पद्धतीने मांडता याव्यात यासाठी अकोला पोलीस दलाने “SP ई-संवाद” हा अभिनव ऑनलाईन उपक्रम सुरू केला आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या सुविधेमुळे आता नागरिकांना प्रत्यक्ष पोलीस अधीक्षक कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नसून घरबसल्या ऑनलाईन माध्यमातून थेट संवाद साधता येणार आहे.

अकोला जिल्ह्यातील शहर तसेच ग्रामीण भागातून दररोज अनेक नागरिक पोलीस अधीक्षक कार्यालयात भेटीसाठी, तक्रारी व निवेदन देण्यासाठी, सूचना मांडण्यासाठी किंवा विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी येत असतात. नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर पोलीस अधीक्षक स्वतः लक्ष देत असतात. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने “SP ई-संवाद” ही ऑनलाईन सुविधा सुरू करण्यात आली आहे.

या उपक्रमामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार असून, त्यांना कार्यालयात येण्यासाठी वेळ आणि प्रवास खर्च करण्याची गरज भासणार नाही. नागरिकांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार ऑनलाईन मीटिंगसाठी वेळ निश्चित करता येणार आहे. निर्धारित वेळेनुसार ई-मेलवर प्राप्त होणाऱ्या लिंकच्या माध्यमातून नागरिक थेट पोलीस अधीक्षकांशी संवाद साधून आपली तक्रार, निवेदन, समस्या किंवा सूचना मांडू शकतील.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांचा वेळ व प्रवास खर्च वाचविण्यासोबतच इंधन बचतीला प्रोत्साहन देणे हाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

SP E-Samvad

‘SP ई-संवाद’साठी प्रक्रिया

अकोला पोलिसांकडून उपलब्ध करून देण्यात आलेला QR कोड स्कॅन करावा किंवा SP ई-संवाद पोर्टल या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर आवश्यक माहिती भरून नोंदणी करावी. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना ऑनलाईन मिटिंगसाठी ई-मेलवर लिंक प्राप्त होईल. निर्धारित वेळेनुसार त्या लिंकच्या माध्यमातून पोलीस अधीक्षकांशी थेट ऑनलाईन संवाद साधता येणार आहे. अकोला पोलीस दलामार्फत नागरिकांना अधिक कार्यक्षम, आधुनिक आणि लोकाभिमुख सेवा देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत असून “SP ई-संवाद” ही सुविधा त्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

दरम्यान, नागरिकांना या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन अकोला पोलीस दलाने केले आहे. तसेच, इच्छुक नागरिकांना पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला येथे प्रत्यक्ष भेट देण्याची सुविधाही पूर्ववत सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top