Tipper Fled : अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाच्या कामात अडथळा निर्माण करून रेतीने भरलेला टिप्पर पळवून नेल्याची घटना देऊळगाव राजा शहराजवळील संजयनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात विना क्रमांकाच्या टिप्पर चालकासह टिप्पर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कारवाई सुरू असताना केला हस्तक्षेप ; देऊळगाव राजात खळबळ
गजानन तिडके
देऊळगाव राजा : अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाच्या कामात अडथळा निर्माण करून रेतीने भरलेला टिप्पर पळवून नेल्याची घटना देऊळगाव राजा शहराजवळील संजयनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात विना क्रमांकाच्या टिप्पर चालकासह टिप्पर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, गजानन सोपान टेकाळे (वय ३७), ग्राम महसूल अधिकारी, पिंपळगाव बुद्रुक यांनी दिलेल्या तक्रारीवरून कायम गुन्हा क्रमांक २४८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम २२१, ३०३(३) तसेच अवैध गौण खनिज अधिनियम कलम २१(१) व २१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, २५ मे रोजी मध्यरात्री १२.१५ वाजताच्या सुमारास संजयनगरजवळ महसूल पथक गस्त घालत असताना विना क्रमांकाचा टिप्पर अवैधरित्या चार ब्रास रेती, अंदाजे २० हजार रुपये किमतीची, वाहतूक करताना आढळला. संबंधित टिप्परवर कारवाई सुरू असताना तेथे टिप्पर मालक म्हणून ओळख सांगणारा भगवान वाघमारे घटनास्थळी आल्याचा आरोप आहे.
महसूल अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कारवाईदरम्यान आरोपीने शासकीय कामात अडथळा निर्माण केला आणि संबंधित टिप्पर स्वतः चालवत घटनास्थळावरून घेऊन फरार झाला. या प्रकारामुळे महसूल पथकात खळबळ उडाली असून, अवैध रेती वाहतुकीविरोधातील कारवाईत अडथळे निर्माण होत असल्याची चर्चा सुरू आहे.
या प्रकरणी २६ मे रोजी रात्री देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

