Activists in Bibi : बिबी, किनगाव जट्टू आणि हिवरा खंड येथील पिण्याच्या पाण्याच्या समस्येसह जलजीवन मिशन योजनेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागण्यासाठी बिबी येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल दामोदर इंगळे आणि विनोद किसनराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने नेमून दिलेल्या जिजामाता क्रीडा संकुल मैदानात हे उपोषण सुरू असून, प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले उपोषण : नळांमधून अस्वच्छ पाणीपुरवठ्याचा आरोप
बिबी : बिबी, किनगाव जट्टू आणि हिवरा खंड येथील पिण्याच्या पाण्याच्या समस्येसह जलजीवन मिशन योजनेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागण्यासाठी बिबी येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल दामोदर इंगळे आणि विनोद किसनराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने नेमून दिलेल्या जिजामाता क्रीडा संकुल मैदानात हे उपोषण सुरू असून, प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, बिबी येथे पिण्याच्या पाण्याच्या नळांमधून घाण व अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असून, किनगाव जट्टू व हिवरा खंड येथे जलजीवन मिशनच्या कामात कथित अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याची तक्रार वर्षभरापूर्वी करण्यात आली होती. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी तोंडी तसेच लेखी निवेदनाद्वारे माहिती देऊनही कोणतीही प्रभावी कारवाई झाली नसल्याने अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.
उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की, योजनेतील त्रुटींमुळे अनुसूचित जातींसह इतर ग्रामस्थांना दिवसातून दोन वेळा प्रति हंडा २० रुपये दराने पाणी विकत घ्यावे लागत आहे. शासनाच्या योजनेचा गोरगरिबांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणूनही दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दिनांक २५ मेपासून सुरू असलेल्या उपोषणस्थळी वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, मुख्य अभियंता (पाणीपुरवठा), उपविभागीय अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांनी नाममात्र भेट दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्या मागण्या रास्त असल्याने प्रशासनाने तातडीने दखल घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. भेटीदरम्यान अनेक ग्रामस्थांनीही उपोषणकर्त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला आहे.

