The Shiv Mahapuran : साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठात अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथेची बुधवारी (दि. २७) सांगता करण्यात आली. कथाकार प्रेममूर्ती जगदीशानंद शास्त्री यांनी बारा ज्योतिर्लिंगांची सविस्तर माहिती देत उपस्थित भाविकांना शिवभक्तीचे महत्त्व पटवून दिले. यावेळी त्यांनी भिल्लाची कथा सांगत समाजप्रबोधनपर संदेशही दिला.

‘मुलीचा गर्भपात करू नका’; कथाकार जगदीशानंद शास्त्रींचे समाजप्रबोधन
अशोक इंगळे
साखरखेर्डा : साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठात अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथेची बुधवारी (दि. २७) सांगता करण्यात आली. कथाकार प्रेममूर्ती जगदीशानंद शास्त्री यांनी बारा ज्योतिर्लिंगांची सविस्तर माहिती देत उपस्थित भाविकांना शिवभक्तीचे महत्त्व पटवून दिले. यावेळी त्यांनी भिल्लाची कथा सांगत समाजप्रबोधनपर संदेशही दिला.
दि. २१ मेपासून सुरू झालेल्या या शिवमहापुराण कथेत दररोज विविध धार्मिक आणि सामाजिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कथेदरम्यान प्रेममूर्ती जगदीशानंद शास्त्री यांनी मुलींच्या गर्भपाताविरोधात प्रबोधन करत, “मुलीचा गर्भपात करू नका, मुलींचा सन्मान करा,” असे आवाहन केले. मुली या दोन्ही घरांचा आधार असतात, त्यामुळे समाजाने कन्येला समान सन्मान दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
भिल्लाच्या कथेचे विवेचन करताना शास्त्री यांनी महादेव भक्तीचे महत्त्व स्पष्ट केले. शिकार करताना एका भिल्लाकडून नकळत भगवान शंकरांची पूजा कशी घडली, याचे त्यांनी रसाळ शैलीत कथन केले. बारा ज्योतिर्लिंगांचे धार्मिक महत्त्वही त्यांनी सविस्तर उलगडून सांगितले. यावेळी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते.
शिवमहापुराण कथा श्रवणाचे धार्मिक महत्त्व आणि त्यातून मिळणारे आध्यात्मिक लाभ याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. श्री पलसिद्ध महास्वामी मठात सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या पुढाकाराने या कथेचे आयोजन करण्यात आले होते. कथेच्या सांगतेनंतर श्री पलसिद्ध कन्स्ट्रक्शनचे संचालक हभप साहेबराव काटे महाराज, अर्जुन काटे आणि राजेंद्र काटे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
ज्ञानसाधना म्हणजे गुरुंचा उपदेश – हभप डॉ. प्रशांत महाराज ठाकरे
दरम्यान, हभप डॉ. प्रशांत महाराज ठाकरे यांनी कीर्तनातून मार्गदर्शन करताना, “ज्ञानसाधना म्हणजे गुरुंनी केलेला उपदेश होय,” असे सांगितले. वारकरी आणि वीरशैव संप्रदाय मानवजातीला जागृत करण्याचे कार्य करतात. संतांचे विचार वेगवेगळे दिसले तरी त्यांचा उद्देश समाजकल्याण हाच असतो, असे त्यांनी नमूद केले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा उल्लेख करत, चांगले कर्म करण्यासाठी त्यांच्या विचारांचे स्मरण ठेवावे, असा संदेश त्यांनी दिला. या कीर्तन सेवेचे आयोजन सेवानिवृत्त केंद्रप्रमुख कैलास ढोलेकर यांनी केले होते. दि. २६ रोजी शिवपुराण कथेनंतर माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. तसेच कैलास ढोलेकर व अनुजा ढोलेकर यांनीही सहभाग नोंदविला.

