Eid-ul-Adha : पवित्र ईद-उल-अजहा सणाच्या पार्श्वभूमीवर बालापूर शहरात धार्मिक उत्साह, आनंद आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. घरोघरी, मशिदींमध्ये आणि विविध भागांत ईदच्या तयारीला वेग आला असून शहरात सर्वत्र उत्सवी वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नवीन ईदगाह येथे सकाळी ७:१५ वाजता ईद-उल-अजहाची नमाज अदा करण्यात येणार असल्याची माहिती ईद कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.

बंधुभाव, शांतता आणि कुर्बानीचा संदेश; बाळापूरमध्ये ईदची जय्यत तयारी
जाकीर अहमद
बाळापूर : पवित्र ईद-उल-अजहा सणाच्या पार्श्वभूमीवर बालापूर शहरात धार्मिक उत्साह, आनंद आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. घरोघरी, मशिदींमध्ये आणि विविध भागांत ईदच्या तयारीला वेग आला असून शहरात सर्वत्र उत्सवी वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नवीन ईदगाह येथे सकाळी ७:१५ वाजता ईद-उल-अजहाची नमाज अदा करण्यात येणार असल्याची माहिती ईद कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.
बाळापूरमधील नवीन ईदगाह खामगाव रोड, शेगाव-पलसी चौफुली परिसरात असून येथे हजारो मुस्लिम बांधव एकत्र येऊन शांतता, बंधुभाव आणि मानवतेसाठी प्रार्थना करणार आहेत. ईदच्या निमित्ताने लहान मुलांपासून युवक आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, धार्मिक भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
ईद कमिटी आणि आयोजकांनी सर्व नमाजींना नम्र आवाहन केले आहे की, नमाजासाठी वेळेपूर्वी ईदगाहमध्ये उपस्थित राहावे, जेणेकरून कार्यक्रम शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडेल. तसेच स्वच्छता राखणे, व्यवस्थेला सहकार्य करणे आणि नमाजासाठी स्वतःची जानमाज (प्रार्थना चटई) सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ईद-उल-अजहा हा त्याग, समर्पण, संयम आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र सण मानला जातो. समाजात प्रेम, ऐक्य आणि परस्पर बंधुभाव दृढ करण्याचे कार्य हा सण करतो. या निमित्ताने बालापूरमध्ये नागरिक एकमेकांना शुभेच्छा देत आनंद साजरा करणार असल्याचे चित्र आहे.
शेवटी, सर्वांच्या इबादती, कुर्बानी आणि प्रार्थना स्वीकारल्या जाव्यात तसेच समाजात शांतता, सुख आणि समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना व्यक्त करण्यात आली आहे.

