Sukali Nandapur Shaken: किरकोळ वादातून दारुच्या नशेत मामाने भाचीची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना सुकळी नंदापूर येथे 27 मे रोजी रात्री घडली. हत्या केल्यानंतर पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी मामाला बोरगाव मंजू पोलिसांनी काही तासातच गजाआड केले. सुनीता श्रीकृष्ण गवई (वय 45) असे मृतक महिलेचे नाव आहे. उद्धव डोंबाजी नवघरे (वय 65, रा. सुकळी नंदापुर असे आरोपीचे नाव आहे.

दारूच्या नशेत मामाचा रक्तरंजित थरार ; पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला केली अटक
अकोला : किरकोळ वादातून दारुच्या नशेत मामाने भाचीची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना सुकळी नंदापूर येथे 27 मे रोजी रात्री घडली. हत्या केल्यानंतर पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी मामाला बोरगाव मंजू पोलिसांनी काही तासातच गजाआड केले. सुनीता श्रीकृष्ण गवई (वय 45) असे मृतक महिलेचे नाव आहे. उद्धव डोंबाजी नवघरे (वय 65, रा. सुकळी नंदापुर असे आरोपीचे नाव आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास सुनीता गवई या कुटुंबियासोबत घराच्या अंगणात बसले होते. त्यावेळी आरोपी मामा उद्धव नवघरे हा मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या घरासमोर आला व कोणतेही कारण नसताना सुनीता गवई यांच्यासोबत वाद घालू लागला. यावेळी सुनीता गवई यांनी “तुम्ही नेहमी माझ्याशी वाद का घालता?” असे विचारत त्याला सुनावले. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. मात्र, काही वेळातच आरोपी हातात चाकू घेऊन पुन्हा घटनास्थळी परतला. घरासमोरील सिमेंट रस्त्यावर उभ्या असलेल्या कुटुंबीयांवर तो अचानक धावून आला. यावेळी साक्षी गवई यांना वाचविण्याच्या प्रयत्नात सुनीता गवई यांनी मुलीला बाजूला ढकलले असता आरोपीने त्यांच्या उजव्या छातीवर चाकूने वार केला. गंभीर जखमी झालेल्या सुनीता गवई यांच्या छातीतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला व त्या जागीच कोसळून बेशुद्ध पडल्या.घटनेनंतर आरोपीला आवरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, परिसरातील नागरिक जमा होण्यापूर्वीच आरोपी घटनास्थळावरून चाकूसह पसार झाला. साक्षी गवई यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी व नातेवाईक धावून आले. त्यांनी सुनीता गवई यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय, अकोला येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी वैशाली मुळे, ठाणेदार अनिल गोपाळ, पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र धुळे, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे,हेडकॉन्स्टेबल प्रमोद डोईफोडे, सचिन सोनटक्के, अक्षय देशमुख, सुदिप राऊत शेखर कोद्रे किशोर सोळंके शुभम फालके शिवहरी नागे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनेतील आरोपी पसार होण्याच्या मार्गावर असताना पोलिसांनी बेड्या ठोकल्या, दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.
या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दाखल अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक मनोज उघडे यांनी कार्यवाही केली आहे. प्रथमदर्शनी घरगुती किरकोळ वादातून हा खून झाल्याची माहिती पुढे आली असून परिसरात शांतता आहे.

