Mahabreaking

[breaking_news]

The Mini-Secretariat Itself Goes Thirsty :‘मिनी मंत्रालय’च तहानलेले; सिंदखेडराजा पंचायत समितीतील सुविधांचा बोजवारा

The Mini-Secretariat Itself Goes Thirsty : शहरासह तालुक्यात सध्या उन्हाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेला असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत सिंदखेडराजा पंचायत समितीमध्ये पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला; मात्र स्वतः पंचायत समितीच तहानलेली असल्याने या बैठकीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

The Mini-Secretariat Itself Goes Thirsty

आमदारांच्या हस्ते उद्घाटन झालेले प्रतीक्षालय कुलूपबंद; पंचायत समितीतील गैरसोयींवर संताप

अशोक इंगळे

सिंदखेडराजा : शहरासह तालुक्यात सध्या उन्हाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेला असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत सिंदखेडराजा पंचायत समितीमध्ये पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला; मात्र स्वतः पंचायत समितीच तहानलेली असल्याने या बैठकीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सिंदखेडराजा पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील सुमारे १०४ गावांचा समावेश आहे. शिक्षण, आरोग्य, घरकुल, शेती, विहीर अनुदान, रोजगार हमी, पशुसंवर्धन व कृषी विभागाशी संबंधित विविध कामांसाठी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर पंचायत समितीत येत असतात. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य असताना पंचायत समितीमध्ये बसण्याची व पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याची ओरड होत आहे.

नुकतीच आमदार मनोज कायंदे यांच्या उपस्थितीत पाणीटंचाई संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीस तालुक्यातील सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. मात्र ग्रामीण भागातील पत्रकारांना बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामीण समस्यांची खरी माहिती पत्रकारांकडे असल्याने पंचायत समितीच्या कारभारावरील प्रश्न टाळण्यासाठी त्यांना दूर ठेवण्यात आले का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सिंदखेडराजा पंचायत समितीला ग्रामीण भागाचे ‘मिनी मंत्रालय’ म्हटले जाते. साखरखेर्डा परिसरासह दूरवरच्या गावांतील नागरिकांना ५० ते ६० किलोमीटरचा प्रवास करून येथे यावे लागते. मात्र पंचायत समितीत आल्यानंतर नागरिकांसाठी कुठलीही आसन व्यवस्था उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती आहे.कार्यालय परिसरातील झाडांच्या सावलीत अधिकाऱ्यांच्या वाहनांची व्यवस्था केली जाते; मात्र वृद्ध महिला व पुरुष बंद पडलेल्या जलकुंभाच्या सावलीत आसरा घेत बसलेले दिसतात. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

पाणपोई गायब, प्रतीक्षालयाला कुलूप

तत्कालीन गटविकास अधिकारी अंकुश मस्के यांनी पंचायत समितीच्या परिसरात सुधारणा करत रंगरंगोटी व नागरिकांसाठी फिल्टरयुक्त पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. मात्र त्यानंतर प्रशासन बदलल्यानंतर नागरिकांसाठीची पाणपोई गायब झाल्याचा आरोप केला जात आहे.आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या प्रतीक्षालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात झाले होते. परंतु सध्या हे प्रतीक्षालय कायमस्वरूपी बंद ठेवून त्याला कुलूप लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

पंचायत समितीचे सभागृह नागरिकांसाठी खुले करण्यात यावे तसेच पिण्याच्या पाण्याची व बसण्याची तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. ओळखीच्या व वजनदार कार्यकर्त्यांसाठी दालन खुले ठेवणारे अधिकारी सर्वसामान्य नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणार का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top