two Maha E-Seva Centers : शासनाच्या विविध योजना, दाखले आणि शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना सुलभतेने मिळावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेली महा ई-सेवा केंद्रे डोणगाव परिसरात अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. सुमारे ३० हजार लोकसंख्या आणि परिसरातील गावांतील नागरिकांचा भार सध्या अवघ्या दोन महा ई-सेवा केंद्रांवर पडत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

नागरिकांचे अतोनात हाल; आणखी केंद्रे सुरू करण्याची जोरदार मागणी
डोणगाव : शासनाच्या विविध योजना, दाखले आणि शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना सुलभतेने मिळावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेली महा ई-सेवा केंद्रे डोणगाव परिसरात अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. सुमारे ३० हजार लोकसंख्या आणि परिसरातील गावांतील नागरिकांचा भार सध्या अवघ्या दोन महा ई-सेवा केंद्रांवर पडत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
डोणगावच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि आजूबाजूच्या गावांतील नागरिकांच्या गरजांचा विचार करता, सध्या कार्यरत असलेली केंद्रे अत्यंत अपुरी असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, अमोल ठाकरे यांच्या नावावरील दोन केंद्रांपैकी एक केंद्र बंद असून दुसरे केंद्र राजू वाठोरे यांच्या नावावर कार्यरत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात नागरिकांसाठी मर्यादित सुविधा उपलब्ध होत आहेत.
उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रेशनकार्डसंदर्भातील कामे तसेच विविध शासकीय योजनांचे अर्ज भरण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक केंद्रांवर गर्दी करत आहेत. केंद्रांची संख्या कमी असल्यामुळे नागरिकांना सकाळपासून रांगेत उभे राहावे लागते. अनेकदा दिवसभर प्रतीक्षा करूनही काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांना पुन्हा चकरा माराव्या लागत आहेत.
सध्या शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची तातडीची आवश्यकता आहे. मात्र, गर्दी आणि संथ प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच शेतकरी, मजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांना आपला कामाचा दिवस वाया घालवत केंद्रांवर ताटकळत राहावे लागत आहे.
“साधा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी दोन-दोन दिवस चकरा माराव्या लागत आहेत. सर्व्हर डाऊन असणे किंवा प्रचंड गर्दीमुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहेत. शासनाने तातडीने नवीन केंद्रांना मंजुरी द्यावी.”
— विजय खरात, नागरिक, डोणगाव
नागरिकांच्या मते, या भागातील लोकसंख्या आणि वाढत्या कामकाजाचा विचार करता किमान आणखी तीन ते चार महा ई-सेवा केंद्रांची आवश्यकता आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना राज्य महामार्ग ओलांडून बसस्थानक परिसरातील केंद्रांपर्यंत जावे लागत असल्याने गावातील विविध भागांत नवीन केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, याबाबत डोणगावचे निवासी नायब तहसीलदार नितीन बोरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि लोकप्रतिनिधींनी प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने नवीन महा ई-सेवा केंद्रांना मंजुरी द्यावी, अशी मागणी केली आहे.

