Operations : चिखली-जालना महामार्गालगत असलेले ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय सध्या रुग्णांसाठी अपुरे ठरत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत असून रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष?; उपचाराऐवजी रुग्णांना खासगी रुग्णालयाचा सल्ला
गजानन भालेकर
देऊळगाव मही : चिखली-जालना महामार्गालगत असलेले ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय सध्या रुग्णांसाठी अपुरे ठरत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत असून रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
सध्या वातावरणातील बदलामुळे अतिसार, जुलाब, ताप, सर्दी व खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्ण उपचारासाठी शासकीय रुग्णालयाचा आधार घेतात. मात्र, काही रुग्णांना उपचाराऐवजी खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अतिसारासारख्या तक्रारी घेऊन आलेल्या रुग्णांनाही “आम्ही फक्त इमर्जन्सी रुग्ण पाहतो” असे सांगितले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयांचा पर्याय स्वीकारावा लागत असून त्यांचा आर्थिक भार वाढत आहे.
रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध असूनही अपेक्षित सेवा मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवेत सुधारणा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा मिळावी, यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन आवश्यक ती चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

