Battered by Gusty Winds :सिंदखेडराजा तालुक्यात १ जून रोजी रात्री झालेल्या वादळी वाऱ्याने अनेक गावांना तडाखा बसला असून बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागझरी-दरेगाव शिवारातील केळी, आंबा, जांभूळ तसेच नेट शेतीतील विविध पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

दोन एकर केळी बाग भुईसपाट; पंचनाम्यानंतर नुकसानभरपाईची शेतकऱ्यांची मागणी
साखरखेर्डा: सिंदखेडराजा तालुक्यात १ जून रोजी रात्री झालेल्या वादळी वाऱ्याने अनेक गावांना तडाखा बसला असून बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागझरी-दरेगाव शिवारातील केळी, आंबा, जांभूळ तसेच नेट शेतीतील विविध पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
नागझरी येथील शेतकरी मधूकर उत्तमराव वाघ यांच्या दरेगाव शिवारातील गट क्रमांक १७२ मधील दोन एकर केळी बागेला वादळाचा मोठा फटका बसला. बहरलेल्या केळीच्या बागेत मोठमोठे घड लागलेले असतानाच रात्री आठ ते नऊ वाजेदरम्यान आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण बाग मुळासकट जमीनदोस्त झाली.
घटनेची माहिती मिळताच २ जून रोजी महसूल अधिकारी ज्ञानेश्वर दांडगे, कृषी सहाय्यक स्वाती सोनवणे, ग्रामपंचायत अधिकारी लिंबाजी इंगळे आणि उपसरपंच प्रकाश काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्राथमिक अंदाजानुसार या केळी बागेचे सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
तालुक्यातील साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा परिसरात मोठ्या प्रमाणात नेट शेती केली जाते. या भागात मिरची, कारले, सिमला मिरची, टोमॅटो आदी पिकांची लागवड करण्यात आली आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नेट शेतीचे मोठे नुकसान झाले असून संरक्षक जाळ्या आणि पिकांचेही नुकसान झाल्याची माहिती आहे.
याशिवाय नुकताच बाजारात येण्यास सुरुवात झालेल्या गावरान आंब्यालाही मोठा फटका बसला. वादळामुळे आंब्यांचा मोठ्या प्रमाणात सडा पडल्याने फळ उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सवडद, राताळी, मोहाडी आणि परिसरातील अनेक गावांमध्येही बागायती व इतर शेतीपिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शासनाने योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी महिला व बालकल्याण सभापती बंद्रीभाऊ वाघ तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी केली आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

