Mahabreaking

[breaking_news]

The All India Inter-University Softball Tournament :अमरावतीत अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेचा भव्य शुभारंभ; १०७ विद्यापीठांचा ऐतिहासिक सहभाग

The All India Inter-University Softball Tournament :श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल (पुरुष व महिला) स्पर्धा २०२५-२६’ चा दिमाखदार उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

The All India Inter-University Softball Tournament

अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल (पुरुष व महिला) स्पर्धा २०२५-२६’ चा दिमाखदार उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सॉफ्टबॉलच्या इतिहासात प्रथमच पुरुष व महिला अशा दोन्ही गटांच्या राष्ट्रीय स्पर्धा एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी आयोजित करून अमरावतीने क्रीडा क्षेत्रात नवा अध्याय लिहिला आहे.

खेळातून घडते चारित्र्य – पोलीस आयुक्त गणेश शिंदे

प्रमुख अतिथी म्हणून बोलताना पोलीस आयुक्त श्री. गणेश शिंदे यांनी खेळाचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. “अमरावती हे प्रदूषणमुक्त व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर असून अशा पोषक वातावरणात ही राष्ट्रीय स्पर्धा होत आहे,” असे त्यांनी नमूद केले. खेळ केवळ हार-जीत पुरता मर्यादित नसून तो खेळाडूंना संयम, शिस्त आणि कठीण परिस्थितीत जिद्दीने उभे राहण्याची शिकवण देतो. आजची तरुण पिढी तंत्रज्ञानात प्रगती करत असतानाच खेळाच्या माध्यमातून देशासाठी योगदान देण्यास सक्षम होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवाजी शिक्षण संस्थेचा ऐतिहासिक पुढाकार – हर्षवर्धन देशमुख

शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन देशमुख यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले की, “सॉफ्टबॉलसारख्या खेळाला राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळावे, यासाठी शिवाजी शिक्षण संस्थेने पुढाकार घेतला आहे. देशभरातून आलेल्या खेळाडूंना अमरावतीचे आदरातिथ्य व संस्कृतीची ओळख करून दिली जाईल.” खेळाडूंनी मैदानावर कौशल्यासोबतच शिस्त व खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

नियोजनाची जय्यत तयारी – दिलीपबाबू इंगोले

स्पर्धेच्या नियोजनाविषयी माहिती देताना श्री. दिलीपबाबू इंगोले यांनी सांगितले की, देशभरातील १०७ विद्यापीठांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ५ तारखेपर्यंत पुरुषांचे सामने होणार असून ६ ते १० तारखेदरम्यान महिलांच्या स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे ‘ऑल इंडिया’ भारतीय संघासाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे. फ्लड लाईट्सची सुविधा उपलब्ध करून दिल्याने रात्रीच्या वेळीही सामने खेळवले जाणार आहेत.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रकुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी अमरावतीच्या क्रीडा परंपरेचा गौरव केला. “खेळ हे सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम असून त्यातून संयम, सांघिक भावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात. स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणारे हे आयोजन देशासाठी अभिमानास्पद आहे,” असे त्यांनी सांगितले.

या स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी देशपांडे सर आणि दिलीप तुर्की यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ समिती सांभाळत आहे. तसेच, खेळाडूंना अंबादेवी मंदिर, चिखलदरा यांसारख्या पर्यटनस्थळांची माहिती देऊन अमरावतीच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वैभवाची ओळख करून दिली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top