Teak smuggler caught : आलेगाव वनपरिक्षेत्रातील झरंडी नियतक्षेत्रातील राखीव वनामध्ये सुरू असलेल्या अवैध सागवान वृक्षतोडीविरुध्द मोठी कारवाई केली. नियमित गस्तीदरम्यान वनकर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीस कुऱ्हाडीसह सागवानाच्या चौकटी घेऊन जाताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर करण्यात आलेल्या घरझडतीत मोठ्या प्रमाणात अवैध सागवान वनमाल आढळून आल्याने वनतस्करीचे आणखी धागेदोरे समोर आले आहेत.

झरंडी राखीव वनात वन विभागाची धडक कारवाई; अवैध सागवान तस्करीचा पर्दाफाश
निशांत गवई
पातूर : आलेगाव वनपरिक्षेत्रातील झरंडी नियतक्षेत्रातील राखीव वनामध्ये सुरू असलेल्या अवैध सागवान वृक्षतोडीविरुध्द मोठी कारवाई केली. नियमित गस्तीदरम्यान वनकर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीस कुऱ्हाडीसह सागवानाच्या चौकटी घेऊन जाताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर करण्यात आलेल्या घरझडतीत मोठ्या प्रमाणात अवैध सागवान वनमाल आढळून आल्याने वनतस्करीचे आणखी धागेदोरे समोर आले आहेत.
वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, झरंडी राखीव वन क्षेत्रात गस्त घालत असताना वनरक्षकांच्या पथकाला संशयास्पद हालचाली करणारी एक व्यक्ती आढळून आली. चौकशी केली असता त्याच्याकडे सागवानाच्या चौकटी व कुऱ्हाड असल्याचे निदर्शनास आले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची ओळख बबन हरिसिंग जाधव (रा. वसाली) अशी पटली.
प्राथमिक चौकशीनंतर वन अधिकाऱ्यांनी आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली. या कारवाईत घरातून मोठ्या प्रमाणात सागवान वनमाल व सागवानाच्या चौकटी जप्त करण्यात आल्या. संबंधित वनमालाबाबत कोणतीही वैध कागदपत्रे आरोपीकडून सादर करण्यात आली नसल्याने संपूर्ण माल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी भारतीय वन अधिनियम, १९२७ अंतर्गत संबंधित कलमान्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या वनमालाचे मूल्यांकन सुरू असून पुढील तपास वन विभागाकडून करण्यात येत आहे.
ही कारवाई पवन जाधव, प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी, आलेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनपाल एन. एम. नाकाडे तसेच वनरक्षक व्ही. जी. बावस्कर, एस. डी. मस्के, ए. पी. देशमुख, एस. सी. कदम, पी. डी. इंगळे, पी. एस. बाभळे, ए. डी. सरदार आणि पी. एम. डोबळे यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वीरीत्या राबविली.
वनसंपत्तीचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे नमूद करत वनक्षेत्रातील अवैध वृक्षतोड, वनमालाची वाहतूक किंवा साठवणूक याबाबतची माहिती तात्काळ वन विभागाला देण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. अवैध वृक्षतोडीविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

